Narayan Rane: 'मी पुन्हा येईन' ही घमेंड नव्हे, तर आत्मविश्वास- नारायण राणे

‘मी पुन्हा येईन’ या वाक्यात सत्तेचा दर्प होता. राजकारण करताना सत्तेचा दर्प चालत नाही अन्यथा लोकं पराभूत करतात, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. त्यावर भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पवार यांच्यावर पलटवार केला आहे. (bjp mp narayan rane backs devendra fadnavis over mi punha yein statement)

नाव का घेतलं नाही?

प्रसारमाध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले की, शरद पवार यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ‘मी पुन्हा येईन’ या वाक्यात सत्तेचा दर्प असल्याचं पवार नाव न घेता म्हणाले. परंतु हे वक्तव्य त्यांनी कुणाला उद्देशून केलं. ज्यांच्याबद्दल ते हे वाक्य बोलले त्यांचं नाव का घेतलं नाही? हे वक्तव्य पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केलं आहे. परंतु देवेंद्र फडणवीस हे घमेंड करणारे किंवा गर्व करणारे व्यक्ती नाहीत. सत्तेवर असताना त्यांना मुख्यमंत्रीपदाची मस्ती आल्याचं एकही उदाहरण कुणी सांगू शकत नाही. 

हेही वाचा - Narayan Rane: शिवसेनेला शरद पवारांचा अचानक पुळका कसा आला?- नारायण राणे

हा तर आत्मविश्वास

मी पुन्हा येईन, असं वाक्य ते जेव्हा प्रचारसभांमध्ये बोलले, तेव्हा हे वाक्य ते आपल्या कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी बोलले. यामध्ये कुठेही घमेंड किंवा गर्व नव्हता. मी ५ वर्षे चांगलं काम केल्यामुळे जनता मला निवडून देणार, असा विश्वास त्यांना होता. त्यातूनच त्यांनी हे वक्तव्य केलं. तरीही या वाक्यात शरद पवार यांना घमेंड कशी काय वाटली?

कुणाच्या जीवावर?

त्या निवडणुकीत शिवसेनेचे जे आमदार निवडून आले, ते कोणाच्या जोरावर? २०१४ मध्ये शिवसेनेचे खासदार, आमदार निवडून आले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे. २०१९ मध्येही मोदी आणि भाजपामुळे शिवसेनेचे खासदार-आमदार निवडून आले, असा दावा देखील नारायण राणे यांनी केला. 

केवळ राजकारण

ज्या सामनात  'शरद पवार हे मॉडर्न अफझलखान', 'महाराष्ट्राचे खरे शत्रू शरद पवारच', 'शरद पवार कोण? चोरांचे सरदार गुंडाचे बादशहा', अशा मथळ्यासह बातम्या छापून आल्या, त्या सामनात चक्क त्यांची मुलाखत छापून येते? खरं तर सामनामध्ये पवार यांच्यावर जेवढी टीका झाली, तेवढी आजपर्यंत कुणावरही झाली नाही. त्यामुळेच ही मुलाखत केवळ केवळ राजकारण असून राज्यात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटावरून लक्ष वळवण्यासाठीच केलेला प्रकार असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला.  

हेही वाचा - Mahajobs: महाविकास आघाडी फक्त शिवसेना-राष्ट्रवादीची? काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने विचारला प्रश्न
पुढील बातमी
इतर बातम्या