पोलिस निवासस्थानाची राखीव जागा रिक्त करा - मुख्यमंत्री

जोगेश्‍वरी पुर्व येथील मेघवाडी पोलिस स्टेशन तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या जागेवरील झोपड्यांचे अन्यत्र पुनर्वसन करुन ही जागा तात्काळ रिक्त करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआरएच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. या प्रश्‍नी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्र्याना लेखी पत्राद्वारे विनंती केली होती.

पोलिस ठाणे नाही

राज्यमंत्री वायकर यांनी मुख्यमंत्री यांची नागपूर येथील रामगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन यासंदर्भात एक पत्र दिले. जोगेश्‍वरीची लोकसंख्या वाढत असून या ठिकाणी स्वत:च्या जागेत शासनाच्या मालकीचं पोलिस ठाणे नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने इथं पोलिस ठाणे होणं अत्यंत गरजचं आहे, असं मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं. इस्लामीया येथील नगर भुमापन क्र.३ पै.मधील २०२८.०८ चौरस मीटरचा भूखंड मेघवाडी येथे पोलीस ठाणे व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधण्यासाठी आरक्षित आहे. परंतु या जागेपैकी ५७९.०५ चौरस मीटर क्षेत्रावर ३२ झोपड्या अस्तित्वात असल्याचे राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.

     

अधिकाऱ्यांचा कानाडोळा  

 सदर जागा रिक्त करण्यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांसमवेत वेळोवेळी बैठका घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले. परंतू अधिकाऱ्यांनी याकडं कानडोळा करून कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे वायकर यांना मुख्यमंत्र्यांकडे दाद मागावी लागली.

जागा, निधी उपलब्ध 

भुखंडावर पोलिस ठाणे इमारत व पोलीस कर्मचारी निवासस्थान बांधण्यासाठी गेली १० वर्षापासून जागा आरक्षित केलेली अाहे. तसंच आर्थिक निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे. त्यानुसार या ठिकाणी पोलिस ठाणे व पोलिस वसाहतीचे बांधकाम तात्काळ सुरू करणे आवश्यक अाहे. तसंच या जागेवरील झोपडीधारकांचे प्रकल्पबाधित योजनेअंतर्गत घरे देऊन पुनर्वसन करण्याचे अादेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास देण्यात यावेत, अशी मागणी वायकर यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याप्रश्‍नी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिेले आहेत.


हेही वाचा - 

मुंब्रा, दिव्याचा पाणी प्रश्न मार्गी लावणार - रणजीत पाटील

नव्या नोकरभरतीत मराठा समाजासाठी १६ टक्के जागा- मुख्यमंत्री


पुढील बातमी
इतर बातम्या