सिटी बँकेच्या खातेदारांचा मतदानावर बहिष्कार, 'हे' आहे त्यामागचं कारण

डबघाईला आलेल्या सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने दीड वर्षांपूर्वी निर्बंध घातले. मात्र, अद्याप बँकेतील घोटाळेबाजांवर कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही. तसंच बँकेच विलीनीकरण करण्यातही चालढकल केली जात आहे. याचा निषेध करत सिटी बँकेच्या खातेदारांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. तर काही खातेदारांनी नोटाचा पर्याय वापरला. सिटी बँकेच्या मुंबईत १० शाखा असून एकूण ९१ हजार खातेदार आहेत.  

कर्जवाटपातील अनियमितता आणि थकीत कर्जवसुली यामुळे सिटी बँकेवर रिझर्व्ह बँकेने एप्रिल २०१८ मध्ये  निर्बंध लादले होते. त्यामुळे हजारो खातेदारांचे बँकेत पैसे अडकले. मात्र, बँक बुडवणाऱ्यांविरोधात अद्याप कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही. ही बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलीन करण्यात येईल, असं आश्वासन खातेदारांना देण्यात आलं होतं. मात्र, याबाबतही काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे संतप्त खातेदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याचं सिटी को-ऑपरेटिव्ह बँक अकाउंट होल्डर्स असोसिएशनचे नितीन अंबानी यांनी सांगितले. 

नितीन अंबानी म्हणाले की, याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत एक बैठक झाली होती. या बैठकीला राज्य सहकारी बँकेचे विद्याधर अनासकर, सिटी बँकेचे अध्यक्ष व शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ उपस्थित होते. राज्य सहकारी बँकेत सिटी बँकेचे विलीनीकरण जून महिन्यापर्यंत होईल, असं यावेळी अनासकर यांनी म्हटलं होतं. मात्र, अद्याप त्याबाबत काही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे खातेदार संतप्त झाले असून त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. 


हेही वाचा -

राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघडल्या, मतदानाचा खोळंबा


पुढील बातमी
इतर बातम्या