शिवस्मारक बोट अपघाताची चौकशी होणार, मृताच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत - मुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या ताफ्यातील स्पीड बोटीच्या अपघातााच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या अपघातात बेपत्ता झालेला सिद्धेश पवार या तरूणाचा मृतदेह एका बोटीत मृतदेह आढळून आला आहे. बोटीत असलेल्या २५ जणांपैकी २४ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मृत सिद्धेश पवारच्या कुटुंबीयांना ५ लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे.

नेमकं काय झालं?

बुधवारी दुपारी अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम होणार होता. यासाठी पत्रकार, अधिकारी, शिवसंग्रामचे कार्यकर्ते आणि एल अँण्ड टी चे कर्मचारी बोटीने स्मारकाच्या साईटवर निघाले होते. त्यावेळी सव्वा चारच्या सुमारास या ताफ्यातील एक स्पीड बोट खडकावर आपटली आणि बोटीत पाणी भरण्यास सुरूवात झाली. मात्र वेळीच बचावकार्य सुरू झाल्यानं मोठी दुर्घटना टळली. पण यात सिद्धेश पवार नावाचा शिवसंग्राम संघटनेचा कार्यकर्ता बेपत्ता झाला.

कोण आहे सिद्धेश?

मूळचा कोकणातील असलेला सांताक्रूझमध्ये राहात होता. सिद्धेश आपल्या मामांबरोबर शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी गेला होता. तो शिवसंग्राम संघटनेचा कार्यकर्ता होता. सिद्धेशचं ४ महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. पोहता येत नसल्याने काळाने त्याच्यावर घाला घातला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्याचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत.   

 

नियोजनाकडे दुर्लक्ष

इतक्या मोठ्या संख्येनं लोक या कार्यक्रमाला उपस्थित असताना आयोजकांकडून या कार्यक्रमाचं कोणतंही नियोजन करण्यात आलं नव्हतं. उपस्थितांच्या सुरक्षेतेसाठी कोणत्याही उपाययोजना यावेळी नव्हत्या, असा आरोप आता प्रत्यक्षदर्शीकडून होत आहे.

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी

शेकापचे नेते जयंत पाटील यांनीही नियोजनाच्या आभावामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप केला आहे. बोटीत क्षमतेपेक्षा अधिक जणांना बसवण्यात आल्यानं हा अपघात झाला. तर बोटीचा चालक शिकाऊ होता, दिपस्तंभाजवळील भाग खडकाळ असतो, तिथं जाणं धोकादायक असतं हेच त्याला माहिती नसावं आणि त्यामुळंच तो त्या भागाकडे गेला नि त्यामुळंच अपघात झाल्याचंही पाटील यांच म्हणणं आहे.

दरम्यान पवार याला शोधण्याचं काम सुरू आहे. तर या अपघाताची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून या अपघाताच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी जाणाऱ्या बोटीला झालेल्या अपघाताची घटना अत्यंत दुर्देवी आहे. हा प्रकार केवळ अपघातच आहे की घातपात? असा संशय जाणवू लागला आहे कारण कालच आ. विनायक मेटे यांनी शिवस्मारकात अनियमितता असल्याचा आरोप करणं, त्याच्या चौकशीची मागणी करणं आणि आज हा अपघात होणं हे संशयास्पद आहे. यामागे विनायक मेटेंना शांत करण्याचा प्रयत्न आहे का?

- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस


हेही वाचा-

शिवस्मारकाच्या पायाभरणी ताफ्यातील बोटीला अपघात, १ जण बुडाल्याची भीती

शिवस्मारकासाठीची निविदा रद्द करा, प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा-धनंजय मुंडे


पुढील बातमी
इतर बातम्या