मुख्यमंत्री कोण? ही तर मीडियाची चर्चा- देवेंद्र फडणवीस

मागच्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून मतभेद असल्याची चर्चा मीडियात रंगलीय. परंतु आमच्या अभेद्य युतीत मुख्यमंत्री कुणाचा? हा विषय गौण आहे. केवळ मीडिताच ही चर्चा असून मीडियातली ही चर्चा मीडियालाच चघळू द्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या चर्चांना उत्तर दिलं.

माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहात आयोजित शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिन सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात फडणवीस यांनी हा खुलासा केला. मुख्यमंत्री शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात हजर राहणार की नाही राहणार यावरूनही मीडियात चर्चा घेतल्या जात आहेत. पण त्याचा जराही विचार न करता मी आलोय केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घ्यायला, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं प्रेम घ्यायला आणि शिवसैनिकांकडून उर्जा घ्यायला, असं म्हणत फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरूवात केली.

‘न भुतो’ असा विजय मिळवायाचाय 

मुख्यमंत्री पदाबाबत जेव्हा निर्णय घ्यायचा तेव्हा आम्ही घेऊच. त्याचा विचार करण्याची आपल्याला गरज नाही. सध्या आपल्यासमोर एकच लक्ष्य आहे. ते म्हणजे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवण्याचं. आपल्याला या निवडणुकीत 'न भुतो' असा विजय मिळवायचा आहे, असं फडणवीस म्हणाले.

युती भक्कम

युतीमध्ये काही काळापूर्वी थोडाफार वैचारीक ताणतणाव होता. दोन भाऊ एकत्र राहत असताना कधी कधी ताणतणाव निर्माण होतो. परंतु हा तणाव आता दूर झाला आहे. भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण झाली असून युती आणखी भक्कम झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

राज्य आमचंच

शिवसेना-भाजप ही वाघ-सिंहाची जोडी आहे. वाघ-सिंहाची जोडी एकत्र येते, तेव्हा जंगलात राज्य कोण करतं हे वेगळं सांगायची गरज नाही. मग कुणी आघाड्या करोत, त्यासाठी ५६ पक्ष एकत्र येवोत किंवा १५६ पक्ष एकत्र येवोत कौल हा वाघ-सिंहालाच मिळणार, हे पक्कं आहे, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. 


हेही वाचा-

अर्थसंकल्प फुटीची सायबर क्राइमकडून चौकशी करा, राष्ट्रवादीची मागणी

लोकसभेत रामदास आठवले यांची हास्य मैफील; मोदींसह राहुल, सोनिया गांधीही खळखळून हसल्या


पुढील बातमी
इतर बातम्या