एकत्रच लढवणार निवडणुका, मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला पुन्हा गोंजारलं

शिवसेना कितीही स्वबळावर लढण्याची भाषा करत असली, तरी येणारी निवडणूक एकत्रच लढवू, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा गोंजारलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतंच शिवसेनेला युतीसाठी अल्टिमेटम दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी केलेलं हे विधान बघता युतीसाठी अजूनही भाजपा शिवसेनेपुढे मवाळच भूमिका ठेवून असल्याचं दिसत आहे.

महाराष्ट्रातून सर्वाधिक खासदार

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री म्हणाले की, उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रानेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ला २०१४ मध्ये सर्वाधिक खासदार दिले आहेत. २०१९ मध्ये देखील असंच चित्र असेल. कारण काहीही झालं तरी भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्रितच निवडणुका लढवतील आणि जिंकतील देखील.

शिवसेनाही राम मंदिरच्या मुद्द्यावर

भाजपाला राम मंदिर बांधायला जमत नसेल, तर शिवसेना सर्व हिंदूंना जमवून अयोध्येत जाऊन राम मंदिर बांधेल, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केली होती. त्यासंदर्भात प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आधी केवळ आम्हीच राम मंदिर बांधण्याची भाषा करायचो. आता शिवसेनाही राम मंदिर बांधण्याविषयी बोलू लागली आहे, ही चांगलीच गोष्ट आहे.

न्यायालयाच्या निकालानंतरच

लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक कार्याची लोकतांत्रिक व्यवस्था असते. सध्या राम मंदिरचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे. आमची अशी इच्छा आहे की न्यायालयाने या प्रश्नावर पूर्णपणे निकाल द्यावा, त्यानंतर आम्ही मंदिर बांधू. याच चुकीचं काय आहे.

अामचं वयच सेल्फी काढण्याचं

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आंग्रीया क्रूझवर काढलेल्या सेल्फीवरून चांगलाच वादंग झाला होता, यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, त्या आमची परवानगी घेऊनच अप्पर डेकवर बसल्या होत्या. त्यात धोकादायक काहीच नव्हतं कारण खाली लोअर डेकसुद्धा होता. कॅमेरा अँगलमुळे इतरांचा गैरसमज झाला असावा. महाराष्ट्राने आजपर्यंत तरूण मुख्यमंत्री पाहिलेला नाही, तसंच मुख्यमंत्र्यांची तरूण पत्नीही पाहिलेली नाही. आमचं वयच सेल्फी काढण्याचं आहे. सेल्फी लपून न काढता खुलेपणाने काढला त्यात गैर काय?


हेही वाचा-

युती करा नाहीतर एकत्रित निवडणुकांना सामोरे जा, अमित शहांचा शिवसेनेला इशारा

२०१९ मध्ये भाजपाची सत्ता जाणार- पवार


पुढील बातमी
इतर बातम्या