महाराष्ट्राला परदेशातून लस आयातीला परवानगी द्या- उद्धव ठाकरे

महाराष्ट्र (maharashtra) राज्य लसीकरणात संपूर्ण देशात नंबर एकचं राज्य आहे. परंतु केंद्राकडून राज्याला लसीचा पुरवठा खूप धीम्या गतीने होत आहे. त्यामुळे राज्याला शाश्वत व नियमित लसींचा पुरवठा होणं आवश्यक आहे. त्यासाठी परदेशातून लस आयात करण्याची आणि खासगी कॉपोरेट्स समूहांना सीएसआरच्या माध्यमातून लस उत्पादकांकडून लस खरेदीची परवानगी द्यावी, अशी महत्त्वाची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

पंतप्रधानांसोबत कोविडसंदर्भात आयोजित व्हिडिओ काॅन्फरन्सिंग बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. 

धीम्या गतीने लस पुरवठा

राज्याला लसीचा पुरवठा खूप धीम्या गतीने होत आहे. काल २२ एप्रिल रोजी सकाळी आपल्याकडे ६.५ लाख डोस उपलब्ध होते. त्यापैकी दिवसभरात ३.५ लाख डोस वापरण्यात आले. तसंच २ लाख लसींचा पुरवठा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आला. त्यानुसार सद्यस्थितीत मी आपल्या सोबत बोलत असताना राज्यात सुमारे ५ लाख लसींचा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना दिली.

हेही वाचा- आॅक्सिजन, रेमडेसिवीरचा पुरवठा वाढवा, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे पुन्हा मागणी

लस पुरवठ्यात सुस्पष्टता हवी

लसीच्या एकूण उत्पादनापैकी ५० टक्के राखीव साठ्यातून सर्व राज्यांना आणि खासगी रुग्णालये तसेच कॉपोरेट समुहाच्या रुग्णालयांना लस पुरविली आहे. मात्र कोणत्या राज्याला ती किती प्रमाणात पुरविली जाईल त्याविषयी अधिक स्पष्टता हवी. येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला सुरूवात होत आहे. महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील लोकसंख्या ही ५ कोटी ७१ लाख असून त्यासाठी लसीकरणासाठी १२ कोटी डोसेसची आवश्यकता आहे.

आपल्या देशातील लस उत्पादक एवढ्या कमी कालावधीत मोठ्या संख्येने त्याचा पुरवठा करू शकणार नाहीत. त्यामुळे लसींची आयात करण्याची परवानगी राज्याने मागितली तर ती मिळायला हवी. तसंच खासगी कॉपोरेट्स समूहांना सीएसआरच्या माध्यमातून उत्पादकांकडून लस खरेदीची परवानगी द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केली.

ब्रिटनमधील लसीकरण

ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने त्यांना संसर्ग थोपवता आलेला आहे. आपल्याकडे लस उत्पादक कंपन्यांची मर्यादित क्षमता पाहता इतर देशांतून उत्पादन होत असलेल्या लसी आम्ही आयात करून लसीकरण अधिक गतीने वाढवू शकतो का यावर मार्गदर्शन कराव, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली.

(cm uddhav thackeray demands pm narendra modi to allow import covid 19 vaccine in maharashtra )

हेही वाचा- महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय!, प्रविण दरेकर संतापले
पुढील बातमी
इतर बातम्या