मुलुंडमध्ये काँग्रेस-भाजप आमने-सामने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. मुंबईतील मुलुंड इथल्या भाजप कार्यालयावर काँग्रेस नेते भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता.

परंतु, काँग्रेसच्या या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजपचेही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मुलुंड इथल्या भाजपच्या कार्यालयासमोर जमा झाले होते.

दोन्ही पक्ष आमने-सामने आल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनीही बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते आक्रमक होत असल्यामुळे पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

"मोदी माफी मांगो" अशा घोषणा देत, मुंबई काँग्रेसनं चौथे आंदोलन मुलुंड इथे केले. ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसकडून या आंदोलनात मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, काँग्रेस सरचिटणीस चरणसिंग सप्रा आणि चंद्रकांत हंडोरे सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत २०० ते ३०० काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आंदोलन करत होते.

भाजपकडून देखील या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी सकाळपासूनच शक्तीप्रदर्शन करण्यात येत होते. मनोज कोटक यांच्या कार्यालयासमोर भाजपाचे तीनशे ते चारशे कार्यकर्ते जमले होते. आमदार राम कदम आणि भाजप नगरसेवक देखील होते. त्यांनी काँग्रेसच्या विरोधात घोषणा देत, नाना पटोले यांच्या प्रतिमा जाळल्या.

पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये झटापट होणार हे लक्षात घेऊन आधीच बंदोबस्त लावला होता. त्यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना दोन वेगवेगळ्या रस्त्यांवर अडवण्यात आले आणि संभाव्य गोंधळ टाळला गेला.

मनोज कोटक यांनी प्रतिक्रिया देत संसदेची लढाई संसदेत लढावी, तिथे काँग्रेसचा केवळ एकच खासदार महाराष्ट्रातून आहे, त्यामुळे मुंबईतील लोकांची गैरसोय करू नये, असे म्हटले. तर भाई जगताप यांनी त्यांना प्रत्युत्तर देत, ज्या लोकांनी, ज्या विभागातून कोटक यांना निवडून दिले आहे, त्याच विभागात आम्ही आंदोलन करणार असे सांगत, येणाऱ्या काळात अशी अनेक आंदोलनं करणार असल्याचं देखील जाहीर केलं.

भाई जगताप यांनी यावेळी पंतप्रधान मोदी आणि खासदार मनोज कोटक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि मुंबईचा अपमान होत असताना कोटक कोठे होते?


हेही वाचा

'काँग्रेसनं सुरू केलेल्या नौटंकीचा शेवट आम्ही मुंबईत करु'- मनोज कोटक

पालिकेची नारायण राणेंना नोटीस, जुहूतल्या बंगल्याची पाहणी

पुढील बातमी
इतर बातम्या