ठरलं! काँग्रेस-राष्ट्रवादीचा लोकसभेसाठी ५०-५० फाॅर्म्युला

येत्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेत युती होणार का? हे अस्पष्ट असताना काँग्रेस-राष्ट्रवादीचे सूर जुळून आले आहेत. दोन्ही पक्षांचं एकत्रित लोकसभा निवडणूक लढवण्यावर एकमत झालं असून लोकसभेसाठी ५०-५० फाॅर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

अंतिम मोहोर

गुरूवारी दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये जागा वाटपासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत जागेसाठी खेचाताणी करण्याऐवजी निम्म्या निम्म्या जागा लढवण्यावरच भर देण्यात आला. त्यानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी प्रत्येक २४ जागा लढवणार आहेत. या फाॅर्म्युल्यावर अंतिम मोहोर उमटताच शुक्रवारी सकाळी मुंबईत राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीला सुरुवातही झाली आहे.

कोअर कमिटीही राजी

बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणूक एकत्रित लढण्याच्या निर्णयावर दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवत तसा ठराव मंजूर केला. तर गुरुवारी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत काँग्रेसनं ५०-५० फॉर्म्युला मान्य केल्याची माहिती आहे.

आढावा बैठक

या निर्णयासंबंधीची माहिती काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांना देण्यात आली आहे. हा निर्णय झाल्याबरोबर राष्ट्रवादी तयारीला लागली आहे. राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीला सुरवात झाली आहे. या बैठकीत कुठं कोणता उमेदवार द्यायचा यावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर काँग्रेसकडून ही लवकरच आढावा बैठक घेतली जाणार आहे.


हेही वाचा-

आघाडीत बिघाडी अशक्य, शरद पवार यांनी केलं ट्विट

संजय राऊतांनी फेटाळला युतीचा ५०-५० फाॅर्म्युला


पुढील बातमी
इतर बातम्या