पुन्हा लाॅकडाऊन आणून लोकांना त्रास देऊ नका- संजय निरूपम

कोरोना विषाणूच्या (coronavirus) संसर्गाला रोखण्यासाठी गेल्यावर्षी लावण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे तब्बल सव्वातीन कोटी लोकं गरीब झाल्याचा एक रिपोर्ट आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन आणून लोकांना त्रास देऊ नका, असं म्हणत काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी लाॅकडाऊनला विरोध केला आहे. 

लाॅकडाऊनच्या मुद्द्यावर वृत्तवाहिनीशी बोलताना संजय निरूपम म्हणाले, कोरोनाचा संसर्ग वाढला की लगेच लाॅकडाऊन लागू करण्याची तयारी करायची, याला आमचा विरोध आहे. ही रणनिती अत्यंत चुकीची आहे. लाॅकडाऊन लावल्यामुळे अर्थचक्रावर मोठा परिणाम होतो. हा लोकांच्या जगण्यामरण्याशी संबंधित विषय आहे.

गेल्या वर्षीच्या लाॅकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय ठप्प झाले होते, कारखाने बंद होते. परिणामी महाराष्ट्रात (maharashtra) आणि संपूर्ण देशात लोकांच्या हाताला काम नव्हतं. मोठ्या प्रमाणात लोकं बेरोजगार झाले. त्यांच्यापुढं जगायचं कसं, असे प्रश्न निर्माण झाले. गेल्या वर्षी सव्वातीन कोटी लोकं बेरोजगार झाल्याचं एक रिपोर्ट सांगतो. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन आणून लोकांना त्रास देऊ नका, अशी विनंती संजय निरूपम यांनी केली. 

हेही वाचा- लाॅकडाऊन लावल्यास सरकारने लोकांना 'इतकं' पॅकेज द्यावं- चंद्रकांत पाटील

कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचायचं असेल तर सावधगिरी बाळगून नियमांचं पालन करणे आणि लसीकरण हे दोन पर्याय आहेत. गेल्या वर्षी यावर लस उपलब्ध नव्हती. पण आता लस उपलब्ध असल्याने मुंबईत जास्तीत जास्त ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करुन लसीकरण केलं पाहिजे. 

सिनेमागृह आणि माॅलच्या बाहेर पडणाऱ्या लोकांची जबरदस्तीने टेस्ट करून त्यांच्याकडून २५० रुपये घेतले जातात, हा चुकीचा प्रकार आहे. फक्त टेस्टिंगने काहीच हाती लागणार नाही. त्याऐवजी त्यांना लस द्या. जास्तीत जास्त लोकांना लस दिली पाहिजे, असं संजय निरूपम म्हणाले.

लोकांच्या मनात लॉकडाऊनची खूप भीती आहे. आधीच आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या लोकांना पुन्हा लाॅकडाऊन झाल्यास बेरोजगारी, भूकबळीचा सामना करावा लागेल की काय? याची चिंता सतावत आहे. त्यामुळे सरकारमध्ये सामील काँग्रेस (congress) मंत्र्यांना भेटून लाॅकडाऊनचा विरोध करण्याची विनंती करणार असल्याचंही संजय निरूपम यांनी सांगितलं.

(congress leader sanjay nirupam oppose lockdown in maharashtra)

हेही वाचा- महाराष्ट्र लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर? कधीही होऊ शकतो निर्णय…
पुढील बातमी
इतर बातम्या