Advertisement

लाॅकडाऊन लावल्यास सरकारने लोकांना 'इतकं' पॅकेज द्यावं- चंद्रकांत पाटील

लाॅकडाऊन लावल्यास राज्य सरकार हातावर पोट असणाऱ्यांसाठी पॅकेज देणार आहे काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

लाॅकडाऊन लावल्यास सरकारने लोकांना 'इतकं' पॅकेज द्यावं- चंद्रकांत पाटील
SHARES

एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाॅकडाऊन लागू करण्याच्या तयारीला लागा, असे निर्देश प्रशासनाला दिलेले असतानाच भाजपचा लाॅकडाऊनला ठाम विरोध असल्याचं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. शिवाय लाॅकडाऊन लावल्यास राज्य सरकार हातावर पोट असणाऱ्यांसाठी पॅकेज देणार आहे काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी लाॅकडाऊन लागू करण्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर लॉकडाऊन हा उपाय नाही. आता लॉकडाऊन केला तर सरकार एक रुपयांचं पॅकज देणार नाही. मागील वर्षभर लोकं कसे जगले हे मातोश्रीत बसून कळणार नाही. दोन-तीन महिने झाले आता कुठं व्यवहार सुरळीत होत असताना पुन्हा लाॅकडाऊन लादणं योग्य नाही. तसं करायचं असेल, तर आधी सरकारने सुमारे १ कोटींच्या आसपास हातावर पोट असणाऱ्यांसाठी महिना ५ हजार रुपयांचं पॅकेज जाहीर करावं आणि मग लाॅकडाऊनची घोषणा करावी.

एकवेळेस नाईट कर्फ्यू चालेल. ज्यांना नाईट लाईफ हवी आहे, ते तुमच्यासोबत आहेत. सर्वसामान्यांना नाईट लाईफ नको. त्यांना सातच्या आत घरात जायचं असतं. दिवसभराचे दिनक्रम चालूच राहिले पाहिजेत, अशी खोचक टीकाही चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केली. 

लाॅकडाऊनमुळे लोकांना कुठल्या त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. ते मातोश्रीत बसून तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पूर्वी राजे महाराजे वेषांतर करुन वस्तींमध्ये फिरायचे तसं फिरलं पाहिजे. कारण तुम्ही मुख्यमंत्री म्हणून फिरलं तर तुमच्यासोबत ताफा असेल त्यामुळं कोणी तुमच्याशी मनमोकळेपणांनं बोलणार नाही. तुम्ही प्रामुख्यानं झोपडपट्टीमध्ये फिरावं, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला.

हेही वाचा- मास्क न घातल्यास आता ५०० रुपये दंड

सोबतच महाराष्ट्रात चाचण्या वाढवण्याची गरज आहे. लक्षणं नसणाऱ्यांचीही चाचणी झाल्यास रुग्ण लवकर कळतील. त्यामुळे संसर्ग वाढणार नाही. उपचारांची केंद्र वाढवा, अशी सूचना देखील चंद्रकांत पाटील यांनी केली.

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात न आल्यास पुन्हा एकदा पूर्ण लाॅकडाऊन लावण्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय. मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचं पालन होत नाही. विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत. बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचं पालन होताना दिसत नाही.

शेवटी लोकांच्या आरोग्याचं संरक्षण करणं याला आमचं प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचं पालन करावं अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असं समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश टास्क फोर्सच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. 

(bjp state president chandrakant patil demands economic package if lockdown imposed in maharashtra)

हेही वाचा- महाराष्ट्र लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर? कधीही होऊ शकतो निर्णय…

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा