Advertisement

मास्क न घातल्यास आता ५०० रुपये दंड

सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याचं आढळून आल्यास संबंधित व्यक्तीकडून ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.

मास्क न घातल्यास आता ५०० रुपये दंड
SHARES

कोरोना विषाणूचा (coronavirus) संसर्ग पसरू नये म्हणून राज्य सरकारने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करत नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. त्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणं, सुरक्षित अंतर ठेवणं, सॅनिटायझरचा वापर करणं अनिवार्य आहे. बहुसंख्य नागरिक या नियमांचं पालन करत नसल्याने आता प्रशासनाने कडक भूमिका घेण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याचं आढळून आल्यास संबंधित व्यक्तीकडून ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.

याआधी मास्क न घातल्यास २०० रुपये दंड वसूल करण्यात येत होता. परंतु राज्य सरकारने सरसकट दंडाची रक्कम वाढवली आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील धार्मिक स्थळे, लग्न समारंभ, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. नागरिकांकडून सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन होत नसल्याचे आणि मास्कचा वापर होत नसल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे सरकारने कडक भूमिका घेण्याचं ठरवलं आहे.

हेही वाचा- मास्क न घालणाऱ्यांकडून मुंबई पोलिसांनी वसूल केला ४ कोटींचा दंड

मुंबईत महापालिकेच्या (bmc) वतीने क्लीनअप मार्शल मार्फत दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, क्लीनअप मार्शलची अपुरी संख्या आणि त्यांना नागरिक जुमानत नसल्याने २० फेब्रुवारीला पोलिसांना दंडवसुलीचे अधिकार देण्यात आले. तेव्हापासून मुंबई पोलिसांनी कारवाईचा धडाका लावत जवळपास महिन्यात २ लाख ३ हजार जणांवर कारवाई करून ४ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. या रकमेतील ५० टक्के रक्कम पोलीस कल्याण निधीसाठी तर उर्वरीत रक्कम महापालिकेकडे जमा केली जाणार आहे.

त्याचसोबत राज्य सरकारने राज्यभरात रात्रीची संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थिती नियंत्रणात न आल्यास पुन्हा एकदा पूर्ण लाॅकडाऊन लावण्याचे संकेत देखील राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दिले आहेत.  

एकीकडे आपण कोविड (covid19) परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय. मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. शेवटी लोकांच्या आरोग्याचं संरक्षण करणं याला आमचं प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचं पालन करावं अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असं समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचं नियोजन करण्याचे निर्देश टास्क फोर्सच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. 

हेही वाचा- मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख पार


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा