धनंजय मुंडे फायटर, त्यांना ‘या’ रुग्णालयात दाखल करणार- राजेश टोपे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंडे हे कोरोनाची लागण झालेले महाविकास आघाडी सरकारमधील तिसरे मंत्री ठरले आहेत. धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर आहे. स्वभावाने फायटर असलेले मुंडे (corona positive dhananjay munde will admitted in breach candy hospital in mumbai says rajesh tope) या आजारावर मात करत पुन्हा सक्रीय होतील, असा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. 

धनंजय मुंडे यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह निघाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. विशेष म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत धनंजय मुंडे सहभागी झाले होते. तर, मुंडे यांचे २ स्वीय सहाय्यक, मुंबई आणि बीडमधील वाहन चालक तसंच स्वयंपाकी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं पुढं आल्याने सर्वजण धास्तावले आहेत. याआधी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली होती.

हेही वाचा - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की, धनंजय मुंडे यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. सध्या त्यांना कोरोनाची इतर कुठलीही लक्षणं जाणवत नसून केवळ श्वसनाचा त्रास जाणवत आहे. धनंजय मुंडे बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते. परंतु मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर बसतो. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातही धनंजय मुंडे उपस्थित होते. तरंतु हा कार्यक्रम देखील केवळ ५ मिनिटांचा होता. कुणीही तिथं भाषण केलं नाही. तर ध्वजारोहण करतानाही केवळ ५ लोकं होती, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आलेल्या कुठल्याही व्यक्तीला अजून तरी कोरोनाची लक्षणं जाणवलेली नाहीत. तरीही प्रत्येकजण काळजी घेत आहे. धनंजय मुंडे फायटर आहेत. ते कोरोनावर मात करून लवकरच बरे होतील आणि पुन्हा एकदा सक्रीय होतील. त्यासाठी त्यांना आम्ही दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्याचं ठरवलं आहे. यासंबंधीची सर्व तयारी पूर्ण झाली असून लवकरच त्यांना हलवण्यात येईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

राज्यात १५६१ रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून आतापर्यंत राज्यभरात ४६ हजार ०७८ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. दरम्यान, कोरोनाच्या  ३६०७ नवीन रुग्णांचं निदान झालं असून सध्या राज्यात ४७ हजार ९६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा - केंद्राच्या पॅकेजमधून मिळावी उद्योगांना आर्थिक मदत - धनंजय मुंडे
पुढील बातमी
इतर बातम्या