शरद पवारांना उशीरा जाग आलीय- चंद्रकांत पाटील

कोकणातील निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. परंतु भाजपने सर्वात पहिल्यांदा मदत केल्यानंतर आता शरद पवारांना जाग आल्याचा टोमणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

यासंदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने कोकणात प्रचंड नुकसान झालं. वादळ शांत झाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा भाजपने तिथं धाव घेऊन तातडीने मदत पोहोचवली. भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सर्वात पहिल्यांदा कोकणचा दौरा केला. भाजपचे स्थानिक आमदार देखील त्यांच्यासोबत होते. भाजपने पत्रे, ताडपत्रे व प्लास्टिक असा १६ ट्रक माल कोकणात पाठवला. आम्ही मदत केल्यानंतर आणि आमचे दौरे झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना जाग आल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. 

हेही वाचा- म्हणून शरद पवार गेले मातोश्रीवर, त्यांनीच केला खुलासा…

मदत तुटपुंजी 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगडचा दौरा करून मदत जाहीर केली खरी परंतु त्यांना कोकणात झालेल्या नुकसानीचा अंदाजच आलेला नाही. नुकसानीच्या तुलनेत त्यांनी जाहीर केलेली २०० कोटी रुपयांची मदत ही अतिशय तुटपुंजी आहे. कोकणातील शेतकऱ्यांच्या नारळ, सुपारी, आंबा, काजू अशा बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या बागांमध्य नवीन रोपं लावल्यावर झाड मोठं होईपर्यंत पुढचे १० वर्षे तरी कुठलंही उत्पन्न मिळणार नाही हे गृहित धरून सरकारने त्यांना नुकसान भरपाई देणं गरजेचं होतं. याठिकाणी हेक्टरी किंवा एकरी मदत करणं चुकीचं असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. 

पवार यांचा दौरा

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगडचा दौरा केला. या दौऱ्यात तातडीची मदत म्हणून रायगडला तातडीची मदत म्हणून १०० कोटी रुपये, रत्नागिरीला ७५ कोटी रुपये व सिंधुदुर्गला २५ कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.

त्यांच्या पाठोपाठ शरद पवार देखील कोकणच्या दौऱ्यावर गेले आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार  १० जून रोजी शरद पवार रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करून विविध ठिकाणी भेट देतील. त्यात सुरुवातीला दापोली येथील नुकसानीची पाहणी करतील. शेतकऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतील. यावेळी शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे व स्थानिक आमदार उपस्थित राहतील.  

हेही वाचा- शरद पवार कोकण दौऱ्यावर

पुढील बातमी
इतर बातम्या