पंतप्रधानांच्या ‘जनता कर्फ्यू’ला १०० टक्के प्रतिसाद देणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनाचा संसर्ग (coronavirus) रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi,) यांनी येत्या रविवारी २२ मार्चला ‘जनता कर्फ्यू’चं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला राज्य सरकार १०० टक्के प्रतिसाद देणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

हेही वाचा- Coronavirus : राज्यातील कोरोनाबाधीतांची हाफ सेंच्युरी, ३ नवे रुग्ण आढळले

भारतातही करोना व्हायरसचा (COVID- 19) झपाट्याने प्रादुर्भाव होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री ८ वाजता देशाला उद्देशून भाषण केलं. त्यावेळी, या साथीच्या रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने या विषाणूपासून स्वत:चे रक्षण करण्यास प्राधान्य द्यावं, असा संदेश मोदी यांनी दिला.

करोना आटोक्यात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रविवारी २२ मार्च रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत जनतेने स्वत:हून संचारबंदी पाळावी, असं आवाहन पंतप्रधानांनी देशवासीयांना केलं. ‘जनता कर्फ्यू’च्या (janta curfew) काळात कोणीही घरातून बाहेर पडू नका. चौकाचौकात एकत्र येऊ नका. बाजारात विनाकारण फिरू नका. घराच्या-सोसायटीच्या आवारातही एकत्र येऊ नका’, असे सुरक्षिततेचे उपाय मोदींनी सुचवले आहेत.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘जनता कर्फ्यू’ला राज्य सरकारकडून प्रतिसाद देण्यात येईल का? असा प्रश्न आरोग्यमंत्री राजेश टोपे (state health minister rajesh tope) यांना प्रसारमाध्यमांनी विचारला. त्यावर उत्तर देताना टोपे म्हणाले, पंतप्रधानांच्या ‘जनता कर्फ्यू’ला राज्य सरकारकडून ( maharashtra government) १०० टक्के प्रतिसाद देण्यात येईल. सध्याच्या घडीला कोरोनापासून बचाव हाच या व्हायरसपासून स्वत:ला वाचवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे लोकांनीही पंतप्रधानांच्या विनंतीला मान देऊन गर्दी टाळावी. त्यांच्या आवाहनानुसार या दिवशी राज्यातील नागरिकांनी स्वत:हून घराबाहेर न पडता ‘जनता कर्फ्यू’ पाळावा. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळावं, असं आवाहन राज्य सरकारचंही राहील, असं टोपे म्हणाले.  

हेही वाचा- Coronavirus Updates: लोकलमधील भजनी मंडळींचा भजनं बंद करण्याचा निर्णय

पुढील बातमी
इतर बातम्या