'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' एकनाथ शिंदेंच्या बंगल्याजवळ अजित पवारांचे बॅनर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थान परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने बॅनर्स लावण्यात आले आहेत. पण या बॅनर्सवर वाढदिसांच्या शुभेच्छांबरोबरच लिहिलेल्या आणखी एका वाक्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. 

 बॅनरवर 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' असा उल्लेख करण्यात आला आहे. बंड करण्याच्या काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली.

धाराशीवमधल्या तेर गावात देखील भावी मुख्यमंत्री म्हणून चक्क अजित पवारांचे पोस्टर झळकले होते. धाराशीवमधलं तेर ही अजित पवारांची सासरवाडी. 'तेरचे जावई, आमचे नेते जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख असलेले मोठमोठाले बॅनर त्यांच्या सासरवाडीतल्या चौकाचौकात झळकले होते.

विशेष म्हणजे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांचेही फोटो बॅनरवर होते. अजितदादांच्या सासरच्या मंडळींना त्यांच्या मुख्यमंत्री पदाची  लगीनघाई लागली असतानाच  एका काँग्रेस आमदाराने देखील मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याची इच्छा व्यक्त केली होती. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई कार्यालयाबाहेर अजित पवारांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा देणारे बॅनर झळकले होते.  


हेही वाचा

रायगडमध्ये दरड कोसळल्याच्या घटनेवर राज ठाकरेंची टीका

"किरीट सोमय्यांनी मराठी महिलांचा गैरफायदा घेतला” : अंबादास दानवे

पुढील बातमी
इतर बातम्या