शिवसेना नेते अनिल परब यांच्या घरावर ED ची धाड

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या मालमत्तांवर ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल परब यांच्या संबंधित अशा एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडसत्र सुरू करण्यात आलं आहे.

ईडीकडून अनिल परब यांच्याशी संबंधित एकूण सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये अनिल परब यांच्या घराचाही समावेश आहे. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी सुरू असल्याचं बोललं जात आहे. यासोबतच अनिल परब यांच्यावर सुमारे 50 कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचाही आरोप आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनाही आता तुरूंगाची हवा खावी लागेल. त्यांनी आता त्यासाठी तयार रहावे, असा इशारा भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

सोमय्या म्हणाले, “बेनामी मालमत्ता, आर्थिक अफरातफर (मनी लाँड्रिंग), बोगस (शेल) कंपन्या, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयालयाकडे करण्यात आलेल्या तक्रारी आणि फेमा कायद्यातील तरतुदींच्या उल्लंघनासाठी ईडीने कारवाई सुरू केली आहे. मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक हे तुरूंगात गेले. आता परब यांची वेळ आली आहे”.

सोमय्या यांनी परब यांच्या विरोधात विविध पातळ्यांवर तक्रारी नोंदविल्या असून ईडीने त्यासंदर्भात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यानेही परब यांना पैसे दिल्याचा जबाब दिला आहे.

सचिन वाझे याने ईडीला माहिती दिली होती की, अनिल परब यांना त्याने एक मोठी रक्कम दिली होती. याशिवाय पोलिसांच्या बदल्यांसाठी पैसे घेतले होते. तसेच काही कंत्राटदारांकडूनही वसुलीही करण्याची जबाबदारी अनिल परब यांनी सचिन वाझेला दिली होती. त्या प्रकरणात चौकशी आता ईडी करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ही धाड टाकण्यात आली आहे.


हेही वाचा

बृजभूषण सिंह मुंबईत येण्याच्या चर्चांना उधाण, मनसेनं दिला 'हा' इशारा

शिवसेना नेते यशवंत जाधवांना ईडीकडून समन्स, ईडीकडून होणार चौकशी

पुढील बातमी
इतर बातम्या