एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलेय.

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता.

निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरू होती. आज निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे. 

एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून सत्तांतर घडवून आणलं होतं. या घडामोडींनंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणं अपेक्षित होतं. त्यानुसार आज संध्याकाळी निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालामुळे ठाकरे गटाला खूप मोठा झटका मिळाल्याचं मानलं जातंय.

केंद्रीय निवडणूक आयोगात शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता. एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी आमच्याकडे सर्वाधिक लोकप्रतिनिधी असल्याचा युक्तिवाद केला होता. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या वकिलांनी पक्षाची घटना, राष्ट्रीय कार्यकारणी, प्रतिनिधी सभा या बद्दलचे मुद्दे मांडत जोरदार युक्तिवाद केला होता. पण ठाकरे गटाचे हे सर्व प्रयत्न अखेर निष्फळ ठरले आहेत.


हेही वाचा

ढाल-तलवार, इंजिन ते धनुष्यबाण, 'असा' आहे शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा प्रवास

शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा इतिहास जाणून घ्या, बाळासाहेबांचा 'हा' होता हेतू

पुढील बातमी
इतर बातम्या