“भोंगे मंदिरांवरील असले तरी उतरवलेच गेले पाहिजेत, पण…”

“सगळ्या धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरलेच पाहिजे. ते भोंगे मंदिरांवरील असले तरी उतरवलेच गेले पाहिजेत,” असं मत राज ठाकरे यांनी रविवारच्या सभेत व्यक्त केलं. मात्र, आधी मशिदींवरील भोंगे उतरतील आणि मगच मंदिरांवरील भोंगे उतरवू, असंही त्यांनी पुढे नमूद केलं.

राज ठाकरे म्हणाले, “संपूर्ण देशातील हिंदूंना माझी विनंती आहे की मागचा पुढचा अजिबात विचार करू नका, हे भोंगे उतरलेच पाहिजेत. सगळ्या धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरलेच पाहिजे. ते भोंगे मंदिरांवरील असले तरी उतरवलेच गेले पाहिजे, पण मशिदींवरील भोंगे उतरल्यानंतर मंदिरांवरील भोंगे उतरवले जातील.”

“सध्या ‘अभी नही तो कभी नही’ अशी स्थिती आहे. देशातील माझ्या सर्व देशवासीयांना, हिंदू बंधू भगिनींना विनंती आहे की जर यांनी ३ मेपर्यंत ऐकलं नाही, तर ४ मे रोजी प्रत्येक ठिकाणी मला हनुमान चालिसा ऐकूच आली पाहिजे. वाटल्यास पोलिसांकडून रीतसर परवानगी घ्या. त्यांना परवानगी द्यावीच लागते. ती परवानगी घेऊन तुम्ही या सर्व गोष्टी जोरात कराल आणि सामाजिक दृष्ट्या इतके वर्षे प्रलंबित प्रश्न कायमचा निकाली लागेल. यासाठी सर्वांनी हातभार लावावा,” असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

भोंग्यावर बोलत असतानाच औरंगाबादमध्ये अजान सुरू झाले. त्यामुळे राज ठाकरे अधिक संतापले.

“जर सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ दे. तुम्ही अजिबात शांत बसता कामा नये. संभाजीनगरच्या पोलिसांनी मी पुन्हा विनंती करतोय. हे जर या पद्धतीने वागणार असतील, यांना सरळ सांगून समजत नसेल तर महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे यांना एकदा दाखवावीच लागेल. म्हणून पोलिसांना विनंती आहे यांची थोबाडं पहिल्यांदा बंद करा,” असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.


हेही वाचा

राज ठाकरेंच्या भाषणाची औरंगाबाद पोलिसांकडून चौकशी

आमचा पक्ष करेल मशिदींचे रक्षण : रामदास आठवले

पुढील बातमी
इतर बातम्या