होय, मी दिल्लीला चाललोय, राणेंनी केलं जाहीर

आपण राज्यसभेसाठी भाजपाला हो म्हणाल्याचं महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी शनिवारी नरिमन पाॅईंट येथील कार्यालयात अधिकृतपणे जाहीर केलं. राज्यसभेकडे आपण एक संधी म्हणून पहात असून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज १२ मार्च रोजी भरणार असल्याचं राणे म्हणाले.

काय म्हणाले राणे?

माझ्या कार्यकर्त्यांना राज्यातील राजकारणात माझी जास्त गरज असल्याचं वाटत असलं, तरी राज्यसभेवर जाण्याकडे मी एक संधी म्हणून बघत आहे. दिल्लीला जाण्याने माझे कार्यकर्ते नाराज होणार नाहीत. कारण मी दिल्लीला चाललोय, पाकिस्तानला नाही. सोमवारी १२ मार्च रोजी मी राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरणार आहे. अजून राज्यसभेची निवडणूक कोणत्या चिन्हावर लढवायची यावर निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून, भाजपाच्या काय सूचना आहेत, त्या ऐकून अंतिम निर्णय घेण्यात येईल.

शिवसेनेला घाबरत नाही

मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला खूश करण्यासाठी राणेंना राज्यसभेचं तिकीट दिलं, असं म्हटलं जात आहे. त्याला उत्तर देताना ''शिवसेनेच्या दबावामुळे माझा राज्यसभेवर जाण्याचा प्रश्नच नाही. मी माझ्या मर्जीने चाललोय. शिवसेनेला किक मारली तरी ते सत्तेतून बाहेर पडणार नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलो तरी नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध कायम राहणार'' असं म्हणत राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला.

सर्वसाधारण अर्थसंकल्प

राज्याच्या अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबद्दल मत मांडताना राणे म्हणाले, अर्थमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या असल्या, तरी त्या बजेटच्या पुस्तकात मात्र दिसत नाहीत. त्यावर राज्य सरकारने स्पष्टीकरण द्यायला हवं. राज्याच्या विकासासाठी लागणारा पैसा कुठून आणणार हा महत्त्वाचा प्रश्न सरकारपुढे आहे. विरोधकांना टीका करणं सोपं आहे. मात्र, त्यासाठी मार्गदर्शन कोणीच करत नाही. त्यामुळे विरोधकांनी टीका केली तरी त्यांची टीका ही राजकीय सुडापोटी आहे.


हेही वाचा-

मुख्यमंत्र्यांची चाणक्यनीती! राणे भरणार राज्यसभेचा अर्ज?


पुढील बातमी
इतर बातम्या