मागील २ महिन्यांपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत असलेले भारतरत्न माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचं दीर्घ आजारानंतर गुरुवारी सायंकाळी ५.०५ वाजता निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. बुधवारी संध्याकाळपासून त्यांची प्रकृती खालावली होती. वाजपेयी यांना डिमेंशिया नावाचा आजार झाला होता.
वाजपेयी यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी शुक्रवारी सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत नवी दिल्लीतील कृष्ण मेनन या निवासस्थानी ठेवण्यात येणार अाहे. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत केंद्रीय कार्यालयात पार्थिवाचं अंतिम दर्शन घेता येईल. दुपारी १ वाजता अंत्ययात्रेस सुरूवात होणार असून राजघाटामागील राष्ट्रीय स्मृतीस्थळी त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार अाहे.
केंद्र सरकारकडून ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात अाला अाहे. या कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार असून सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात अाले अाहेत. विजयस्थळाच्या बाजूला वाजपेयी यांचं दीड एकरमध्ये स्मारक होणार अाहे.
वाजपेयी यांना ११ जूनपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. जवळपास ६६ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. तर बुधवारी १५ ऑगस्ट रोजी रात्री त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. गुरूवारी सकाळी त्यांची प्रकृती चिंताजन होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सुरेश प्रभू, यांच्यासह इतर दिग्गज नेते एम्समध्ये दाखल झाले. अनेक नेत्यांनी ट्विट करून दु:ख व्यक्त केलं.
सन १९२५ मध्ये जन्म झालेल्या वाजपेयी यांनी १९४२ सालच्या भारत छोडो आंदोलनाद्वारे राजकारणात प्रवेश केला होता. ते १९९१, १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ मध्ये लखनऊ लोकसभा क्षेत्रातून संसदेत निवडून गेले होते.
पंतप्रधान म्हणून ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले बिगरकाँग्रेसी आणि भाजपाचे नेते होते. त्यांनी १९९६, १९९८ आणि १९९९ ते २००४ या दरम्यान पंतप्रधानपद भूषवलं.
हेही वाचा-
'या' १० वक्तव्यांसाठी वाजपेयी आजही ओळखले जातात
अटलजींमुळेच लोकसभा अध्यक्ष झालो - मनोहर जोशी
तरूणपणी 'असे' दिसायचे वाजपेयी!