महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचं पॅकेज

राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली.

राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर
  • बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर
  • बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर ही मदत २ हेक्टर मर्यादित

दोन महिने झाले तरी राज्य सरकारकडून मदतीची घोषणा होत नाही, असं म्हणत विरोधकांकडून वारंवार टीका केली जात होती.

विशेष म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला इशाराच दिला होता. शेतकऱ्यांचा दसरा अंधारात गेला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असं राजू शेट्टी थेट राज्य सरकारला उद्देशून म्हणाले होते.

याशिवाय भाजपच्या अनेक नेत्यांनी राज्य सरकारला शेतकरी मदतीवरुन घेरलं होतं. दुसरीकडे राज्य सरकारकडून पंचनाम्याचं कारण दिलं जात होतं.

“अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री फक्त भाषण करतात. भाषणाने शेतकऱ्यांचे पोट भरत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तत्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी,” असे राजू शेट्टी म्हणाले होते.

तसंच लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडावर बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खेळाडूंना भेटण्यासाठी आणि बोलण्यासाठी वेळ आहे. मात्र मागील अनेक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या आणि शहीद झालेल्या शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असे राजू शेट्टी म्हणाले होते.


हेही वाचा

१०० टक्के क्षमतेनं नाट्यगृह सुरू करा; अमोल कोल्हेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मनसेच्या बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

पुढील बातमी
इतर बातम्या