राज्यपाल के. सी.पाडवींवर संतापले, पुन्हा घ्यायला लावली शपथ

महाविकास आघाडी सरकारचा मंत्रीमंडळ शपथविधी सोमवारी पार पडला. यावेळी एक नाट्यमय घटना घडली. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी चांगलेच संतापले. त्यांनी काँग्रेसचे आमदार के. सी. पाडवी यांना पुन्हा शपथ घ्यायला लावली. 

काँग्रेसचे अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार के. सी. पाडवी यांनी शपथ घेताना स्वत:चं मनोगत व्यक्त केलं. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी संतापले आणि त्यांनी पाडवी यांना सुनावलं. मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी एक नमुना ठरलेला असतो. शपथ घेताना त्यातील मजकूर वाचणे अपेक्षित असते. मात्र, पाडवी यांनी शपथेच्या नमुन्याखेरीज स्वत:चं मनोगतही व्यक्त केलं. त्यामुळं राज्यपाल संतापले. आपल्याला जे दिलं गेलं आहे तेच वाचावं. अनावश्यक वाचू नये, अशा शब्दात पाडवी यांना राज्यपालांनी फटकारलं.

राज्यपाल म्हणाले की, माझ्यासमोर अनेक ज्येष्ठ नेते बसले आहेत. स्वत: शरद पवार आहेत. वाटल्यास त्यांना विचारा. त्यांना योग्य वाटत असेल तर माझी हरकत नाही. असं बोलून राज्यपाल थांबले नाहीत तर त्यांनी पाडवी यांना पुन्हा शपथ घ्यायला लावली. त्यानंतर पाडवी यांनी परंपरेनुसार शपथ घेतली. शपथपत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर पाडवी यांनी राज्यपालांची माफीही मागितली. महाविकास आघाडीच्या पहिल्या शपथविधीदरम्यानही याच मुद्द्यावरून वाद झाला होता. त्यावेळी शपथ घेताना उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी आपापल्या पक्षप्रमुखांची व दैवतांची नावंही घेतली होती. त्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी नाराजी दर्शवली होती.


हेही वाचा -

३६ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी?


पुढील बातमी
इतर बातम्या