मराठा समाजाच्या मागण्यांसाठी संभाजी पाटलांचं आमरण उपोषण

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाचे हिंगोलीतील प्राध्यापक संभाजी पाटील गेल्या सात दिवसांपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्यासह १२ जण उपोषणाला बसले असून सहा जणांची तब्येत खालावली आहे. प्रशासनाकडून त्यांना रूग्णालयात दाखल करण्याची विनंती करण्यात येत आहे. 

उपोषणकर्त्यांनी ही विनंती धुडकावून लावत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपोषणादरम्यान उपोषणकर्त्यांच्या जिवास धोका निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा संभाजी पाटील यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिला आहे.

करो या मरो

मराठ्यांना आरक्षण द्यावं, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना त्वरीत फाशीची शिक्षा द्यावी, मराठा आंदोलनादरम्यान आत्मआहुती दिलेल्या ३९ आंदोलकांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत त्वरीत मिळावी या आणि यासारख्या अनेक मागण्या मराठा समाजाच्या आहेत. या मागण्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून लढत आहे. मात्र त्यांच्या पदरी फक्त कोरडी आश्वासनच पडत असल्याचा आरोप करत आता संभाजी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करो या मरोची भूमिका स्वाकारली आहे. त्यानुसार संभाजी पाटील गेल्या सात दिवसांपासून आपल्या सहकाऱ्यांसह आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसले आहेत. 

सरकारकडून दखल नाही

उपोषणाचा गुरूवारी सातवा दिवस असून सहा जणांची तब्येत खालावली आहे. असं असताना राज्य सरकारकडून मात्र अद्यापपर्यंत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळं राज्य सरकारनं त्वरीत आरक्षणासह अन्य मागण्यांवर निर्णय घ्यावा. अन्यथा उपोषणादरम्यान काही झालं तर त्याला सरकार जबाबदार असेल याचा पुनरूच्चार संभाजी पाटील यांनी केला आहे.


हेही वाचा - 

मराठा समाजाचा आता महाराष्ट्र क्रांती सेना पक्ष


पुढील बातमी
इतर बातम्या