सरकारी ड्रेस कोडमध्ये बदल, जीन्स चालेल पण टी-शर्ट नाही

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेला ड्रेस कोड आता पुन्हा बदलण्यात आला आहे. राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता कार्यालयात जीन्स वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, टी शर्ट वापरण्यास मुभा देण्यात आलेली नाही.राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय घेतला आहे.   

सध्याच्या नियमांनुसार सरकारी कार्यालयांमध्ये औपचारिक कपडे घालून येणं बंधनकारक करण्यात आलं होतं. ८ डिसेंबरला सरकारी कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोडबाबत आदेश काढून काही बाबी सामान्य प्रशासन विभागानं स्पष्ट केल्या आहेत. त्यामध्ये जीन्स आणि टी शर्ट घालण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, आता सामान्य प्रशासन विभागाने सरकारी कर्मचाऱ्यांना जीन्स घालण्यास परवानगी दिली आहे. 

सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून एका चांगल्या प्रतीच्या वागणुकीची तसेच व्यक्तीमत्वाची अपेक्षा नागरिकांकडून करण्यात येते. अशा परिस्थितीत जर अधिकारी व कर्मचारी यांची वेशभूषा ही अशोभनीय, गबाळी तसेच अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम   कामकाजावरही होत असतो. या सगळ्या बाबी विचारात घेऊन मंत्रायलय तसेच सर्व राज्य सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा याबाबत ८ डिसेंबरला मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या.

या होत्या मार्गदर्शक सूचना

१) गडद रंगांचे चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले कपडे परिधान करू नयेत. तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जीन्स टी-शर्टचा वापर कार्यालयामध्ये करू नये.

२) खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा (शुक्रवारी) खादी कपडे घालावेत.

३) महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅन्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा. तसेच पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बूट (शूज), सॅन्डल याचा वापर करावा.

४) कार्यालयामध्ये स्लिपर वापरू नये.

५) सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा. महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात साडी, सलवार/चुडीदार कुर्ता, ट्राऊझर पँट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा घ्यावा. पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅन्ट/ ट्राऊझर पॅन्ट असा पेहराव करावा.

६) परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा याची दक्षता घ्यावी.

कार्यालयात जीन्स व टी शर्टवर बंद घातल्याने कर्मचारी संघटना खासकरून तरुण अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे ड्रेस कोडमध्ये सुधारणा करण्याची मागणी पुढे येऊ लागली होती.आता हे सर्व नियम कायम राहणार असून त्यातील जीन्सबाबत मात्र सूट देण्यात आली आहे.



हेही वाचा -

चिंता वाढली, राज्यात १७ हजार ८६४ कोरोनाचे नवे रुग्ण

दर आठवड्याला कोरोना लसीचे २० लाख डोस द्या, राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी

पुढील बातमी
इतर बातम्या