अशा विमान कंपन्यांच्या पेकाटात लाथ घालायला हवी – राजू शेट्टी

‘एअर इंडिया’च्या कर्मचाऱ्याला शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीची घटना ताजी असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आता प्रवाशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या, प्रवाशांना त्यांच्या हक्काच्या सोयी-सुविधा न पुरवणाऱ्या विमान कंपन्यांच्या पेकाटात लाथ घालण्याची भाषा केली आहे. 'जेट एअरवेज'च्या विमानाने मुंबईहून दिल्लीला निघताना आलेल्या कटू अनुभवानंतर राजू शेट्टी यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार राजू शेट्टी हे बुधवारी 'जेट एअरवेज'च्या विमानाने दिल्लीला रवाना होणार होते. नियमाप्रमाणे, विमानउड्डाणाच्या पुरेशा कालावधीआधी आलेले शेट्टी हे सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर मुंबई विमानतळाच्या लाऊंजमध्ये बसले होते. काही वेळानंतर 'जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्याने राजू शेट्टी ज्या विमानाने प्रवास करणार होते, त्या विमानाने ‘टेक ऑफ’ घेतल्याची माहिती दिली. राजशिष्टाचाराप्रमाणे खासदार ज्या विमानाने प्रवास करणार आहेत, त्या विमानाच्या उड्डाणाआधी त्यासंदर्भात माहिती सदर खासदार प्रवाशाला द्यावी लागते. 'जेट एअरवेज'च्या कर्मचाऱ्याने या नियमाचे पालन केले नाहीच, उलट मुंबईहून दिल्लीला पुढच्या विमानाने जाणाऱ्या शेट्टी यांच्याकडून 'जेट एअरवेज'ने 2 हजार रुपये दंड आकारला.


हेही वाचा - 

माझी चूक नाही तर मी माफी का मागू - गायकवाड

'रवींद्र गायकवाड यांना सायकलने येऊ द्या'


एअरलाइन्स कंपनीच्या मनमानीचा अनुभव आल्यानंतर राजू शेट्टी यांनी याआधी ‘एअर इंडिया’च्या कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या कृत्याचं समर्थन केलं. लोकप्रतिनिधींना जर अशी वागणूक मिळत असेल, तर सर्वसामान्य प्रवाशांची काय कथा? ही प्रतिक्रिया व्यक्त करत खासदार राजू शेट्टी यांनी झाला प्रकार 'एविएशन कमिटी'समोर ठेऊन तिथे दाद मागणार असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, जेट एअरवेज प्रशासनाकडून झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागण्यात आली आहे. संबंधित प्रवासी बोर्डिंग गेटवर वेळेवल न पोहोचल्यामुळे हा प्रकार घडल्याचे विमानकंपनीकडून सांगण्यात आले आहे. तसेच, मुंबई विमानतळावर पॅसेंजर अनाऊन्समेंट करण्याची परवानगी नसल्यामुळे तशी अनाऊन्समेंट केली नसल्याचेही जेट एअरवेजकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, झाल्या प्रकाराबद्दल आम्ही दिलगीर असून राजू शेट्टी यांना आकारण्यात आलेला 2 हजार रुपयांचा दंडही त्यांना परत करण्यात आल्याचे कंपनी प्रशासनाने जाहीर केले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या