किरीट सोमय्या, नील सोमय्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

भाजपचे नेते किरीट सोमय्या, त्यांचे पुत्र नील सोमय्यांविरोधात मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी नागरिकांकडून गोळा केलेल्या निधीत कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सोमय्या पिता-पुत्रांवर ठेवण्यात आला आहे.

निवृत्त लष्करी अधिकारी बबन भोसले यांच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात सोमय्या पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी याप्रकरणी सोमय्या पित्रा-पुत्रांना अटक होणारच असा इशारा दिला आहे. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

'आयएनएस विक्रांत' युद्धनौकेवर युद्धाचे स्मारक बनवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या यांनी सर्वसामान्यांकडून तब्बल ५८ कोटींचा निधी गोळा केला. मात्र, हा निधी नंतर त्यांनी राज्य सरकारकडे सोपवलाच नाही, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

तसंच, याप्रकरणी राज्य सरकार चौकशी करेल, असंही त्यांनी काल सांगितलं होतं. त्यानंतर मुंबईतील निवृत्त लष्करी अधिकारी बबन भोसले यांनी किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली आहे.


हेही वाचा

राज ठाकरेंच्या ९ एप्रिलच्या सभेला ठाणे पोलिसांनी परवानगी नाकारली

"असत्यमेव जयते..." ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचं ट्विट

पुढील बातमी
इतर बातम्या