९ एप्रिल रोजी ठाण्यामध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) हे सभा घेणार आहेत. मनसे (MNS) अध्यक्षांनी गुढीपाडव्याच्या जाहीर सभेत मशिदींवरील भोंगे, मदरशांमधील गैरप्रकार आणि हनुमान चालिसा आदी विविध मुद्यांवर आपली भूमिका मांडली. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर चौफेर हल्ला चढवला. आता राज ठाकरे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ठाण्यात ९ एप्रिलला जाहीर सभा होत आहे.
ठाण्याच्या (Thane) गडकरी रंगायतन समोरील मूस रोड येथे सभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र या रस्त्यावरच्या सभेसाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
पोलिसांनी मनसेला दुसरा उपाय म्हणून बंदिस्त सभागृह किंवा खुले मैदानाठिकाणी सभा घेण्याची सूचना दिली आहे. मात्र याबाबत उद्या मनसे नेते बाळा नांदगावकर हे ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. त्यानंतरच सभेची पुढील दिशा ठरेल.
ठाणे पोलिसांनी रस्त्यावर होणाऱ्या अडथळे, शहरातील इतर कार्यक्रम तसेच रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी यामुळे रस्त्यावरील सभेची परवानगी नाकारली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवतीर्थावर राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीकेचे आसूड ओढत मशिदीवरील केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. आपल्यावरच्या आरोपांना आणि कार्यकर्त्यांच्या संभ्रमांना प्रत्युत्तर देण्यासाठी ठाण्यात गडकरी रंगायतन येथील रोडवर इथं ९ एप्रिल रोजी उत्तर सभा घेण्याचा निर्णय मनसेकडून घेण्यात आला.
सभेसाठी पोलिसांची परवानगी तसंच रोडची पाहणी करण्यासाठी मनसेचे नेते नितीन सरदेसाई, मनसे नेते अभिजीत पानसे, मनसेचे ठाणे पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
ठरलेली सभा ही होणारच याबद्दल कुठलीही शंका असण्याचे कारण नाही. त्याच्या तयारीसाठी आम्ही आता सगळे जमले होतो आणि ती सभा होणारच, आमचं पोलिसांळी बोलणं सुरु आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.
हेही वाचा