मेट्रो कारशेड हलवल्यामुळे ‘इतका’ खर्च वाया?

आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग इथं हलविण्याचा राज्य सरकारचा निर्णय दुर्दैवी आणि अहंकारातून घेतलेला आहे. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास ४ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असं याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना, जी मेट्रो रेल्वे पुढच्या वर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली असती, तो प्रकल्प आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे. आरेच्या कारशेडसाठी ४०० कोटी रुपये आधीच खर्च झाले आहेत. सरकारने कारशेडच्या कामावर लावलेल्या स्थगितीमुळे १३०० कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. शिवाय कारशेड हलवल्यामुळे ४ हजार कोटींचा वाढीव भार सरकारच्या तिजोरीवर पाडल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

हेही वाचा- मुंबईसाठी मोठा निर्णय! मेट्रो कारशेड आरेऐवजी कांजूरमार्गमध्ये होणार

कांजूरमार्ग येथील जागेचा वाद कायम राहिल्यास २४०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार. आज त्यात आणखी किती वाढ होणार? एवढं सारं करून मेट्रो प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबणीवर. आपल्या अहंकारासाठी मुंबईकरांच्या प्रवास सुखाला खीळ बसवून सरकार नेमकं काय साध्य करू इच्छिते? जनतेची किती मोठी ही दिशाभूल आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली.

जनतेशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना आरे काॅलनीतील वादग्रस्त मेट्रो कारशेड हलवून कांजूरमार्ग येथील शासकीय जमिनीवर नेण्यात येणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवार ११ आॅक्टोबर रोजी केली.

आरे कारशेडला माझा विरोध होताच. तशी भूमिकादेखील मी मांडली होती. म्हणूनच आरेतील जंगलासाठी आंदोलन करणाऱ्या पर्यावरणवाद्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने नुकतीच आरेतील ६०० एकर जमीन जंगल म्हणून घोषित केली आहे. त्यामुळे या जंगलाची व्याप्ती आता ८०० एकर झाली आहे. आरेतील वनसंपदेचं संरक्षण करण्याचा दुसरा टप्पा म्हणून आरेतील कारशेड दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आरेतील कारशेड आता कांजूरमार्ग इथं करण्यात येणार आहे. ही जमीन सरकारची आहे. त्यामुळे जमिनीसाठी एक पैसाही द्यावा लागणार नाही. जनतेचा पैसा वापरण्यात येणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. 

हेही वाचा- मेट्रो कामांमुळं मुंबईच्या अनेक रस्त्यांवर प्रचंड वाहतूककोंडी
पुढील बातमी
इतर बातम्या