म्हणून राज ठाकरे भडकले, पावणे दोन तासाने लागला मतदानासाठी नंबर

मतदान केंद्रावर असलेल्या प्रचंड गर्दीमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मतदान करण्यासाठी तब्बल पावणेदोन तास रांगेत उभं राहावं लागलं. दीड वाजेच्या सुमारास ते मतदान करून मतदान केंद्राबाहेर पडले. त्याआधी त्यांचा फोटो काढण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांनी मतदान केंद्राबाहेर एकच गर्दी झाली होती. या गर्दीमुळे वृद्धांना मतदान केंद्राबाहेर पडणं मुश्कील झाल्याने राज प्रसिद्ध माध्यमांच्या प्रतिनिधींवर चांगलेच भडकले.

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात राहणारे राज ठाकरे यांना मतदानासाठी दादरचं बालमोहन विद्यामंदिर हे मतदान केंद्र आलं होतं. या मतदारसंघात शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यात लढत आहे. राज ठाकरे आई कुंदा ठाकरे, पत्नी शर्मिला, मुलगा अमिल आणि मुलगी उर्वशी यांच्यासोबत मतदान केंद्रावर पोहोचले. परंतु मतदान केंद्रावरील गर्दी आणि व्हीव्हीपॅट पावतीसाठी लागणारा वेळ यामुळे त्यांना रांगेत तिष्ठत उभं राहावं लागलं. पावणेबारा वाजता रांगेत उभे राहिलेल्या राज यांना अखेर पावणेदोन तासांनंतर मतदानाचा हक्क बजावता आला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांविरोधी भूमिका घेत सभांचा धडाका लावल्याने देशभर चर्चेत आले आहेत. त्यामुळे त्यांचा फोटो घेण्यासाठी मतदान केंद्रावर प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींची एकच गर्दी झाली होती. यामुळे महिला आणि वृद्ध मतदारांना मतदान केंद्राबाहेर पडणं मुश्कील झालं. ही बाब राज यांच्या लक्षात येताच राज प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींवर चांगलेच भडकले. एकाला तर त्यांनी हात धरून बाजूला करत वृद्ध महिलेला वाट करून दिली.


हेही वाचा-

डोंबिवली, बोरीवलीत मतदारांचा खोळंबा

मतदार यादीत हजारो बोगस नावं; शिवसेना, बविआचा आरोप


पुढील बातमी
इतर बातम्या