इतरांना सावधगिरीचे धडे देणाऱ्या ४ मंत्र्यांनाच कोरोना- चंद्रकांत पाटील

ठाकरे सरकारची ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी गत आहे. कोविडवर एक रुपयाही खर्च न करता, सतत केंद्राकडे बोट दाखवायचं काम राज्य सरकार करत आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केला.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून सरकारला चांगलच झोडपलं. ते म्हणाले, ठाकरे सरकार कोरोना नियंत्रणात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. इतरांना सावधगिरीचे धडे देणाऱ्या या सरकारमधील ४ मंत्र्यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून हे सरकार मात्र आपल्या सत्तेच्या गुर्मीत आणि इतरांवर दोषारोप करण्यात व्यस्त आहे. 

कधी नेत्यांचा वाढदिवस सोहळा, कधी पदग्रहण सोहळा तर कधी हजारोंच्या संख्येने सभा असे अनेक सोहळे करून या सरकारने स्वतः कोरोनाचा संसर्ग (coronavirus) वाढवला आहे. राज्यातील जनतेला कोरोनाच्या दरीत ढकलून हे मंत्री मात्र आता स्वतः आयसोलेशनमध्ये जाऊन बसले आहेत! तर, कोरोना काळात सरकारची तोंड भरून स्तुती करणारे मंत्री आणि नेते आता राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट आलं असताना अचानक गायब झाले आहेत.

हेही वाचा- “कल करे सो आज कर”, कार्यालयीन वेळेबाबत पंतप्रधानांकडे उद्धव ठाकरेंची ‘ही’ मागणी

ठाकरे सरकार कोरोना नियंत्रणात किती यशस्वी झाले, हे आज राज्याच्या सद्यस्थितीवरून दिसत आहे. कोरोनाची साखळी आम्ही तोडणार', 'कोरोना नक्की हरणार!', असा दावा करणाऱ्या ठाकरे सरकारला राज्यातील वाढते कोरोना रुग्ण दिसणं बहुतेक बंद झालं आहे. राज्यात दिवसागणिक रुग्ण संख्या वाढत असताना सरकार मात्र हाताची घडी घालून राज्यातील जनतेला संकटाच्या दरीत ढकलण्याचं काम करत आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

मुंबईत कोरोनामुळे (covid19) आतापर्यंत ११ हजार ४३७ जणांचा बळी गेला आहे. पुण्यात सर्वाधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र पुण्याचे पालकमंत्री हे मंत्रिमंडळातील कथित आरोपी मंत्री कुठे आहेत? ते कसे निर्दोष आहेत? हे सांगण्यात व्यस्त आहेत.   

भाजपाने (bjp) मंदिर उघडण्यासाठी केलेल्या मागणीमुळे कोरोना वाढत आहे, असा आरोप महाविकास आघाडीमधील काही लोक करत आहेत. परंतु, भाजपाने केवळ मंदिर उघडण्याची मागणी केली होती, पब व बार उघडण्याची नाही. मग केवळ मंदिर उघडल्याने कोरोना होतो, असं या ठाकरे सरकारला वाटतं का? 

ठाकरे सरकारने सत्तेच्या गुर्मीत आणि विरोधकांवर केवळ दोषारोप करण्यापेक्षा कोरोना नियंत्रणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला.

(maharashtra bjp president chandrakant patil slams thackeray government on increasing covid 19 patients)

हेही वाचा- 'या' गोष्टींची काळजी न घेतल्यास लसीकरणानंतरही होईल कोरोना
पुढील बातमी
इतर बातम्या