महाविकास आघाडीच्या मंत्र्याने दिले कडक निर्बंधांचे संकेत

राज्यात दिवाळीपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. तसंच तज्ज्ञांकडून कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा एकदा लाॅकडाऊन लागू होणार काय? अशा चर्चा सुरू असताना महाविकास आघाडी सरकारमधील मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी निर्बंधांचे संकेत दिले आहेत. 

याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की, राज्यात काेरोनाबाधित रुग्णांचे आकडे वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. शाळा सुरू करायच्या की नाही, याचा स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं कोरोनाला अटकाव करण्यात आला, तसं काम कुठेही झालेलं नाही. तरीही खबरदारी घेणं महत्वाचं आहे. 

सरकारकडून राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. पुढील ८ दिवस अंदाज घेऊन काही निर्बंध आणता येतील का? याचा विचार सुरु आहे. शेवटी जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. वेळप्रसंगी रेल्वे आणि विमानसेवा तसंच क्वारंटाईनबाबत काही कडक निर्बंध आणावे लागतील. कुठलेही निर्णय अभ्यास करूनच घेतले जातील.

हेही वाचा- राज्यात पुन्हा लाॅकडाऊन होणार? उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले...

मुंबई हे कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. अनेक राज्यांमधून इथं लोक येतात. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून नियमांचं खूप काटेकोरपणे पालन करावंच लागेल. मुंबईत एवढी गर्दी असतानाही राज्य सरकारनं चांगलं काम केलं आहे. दाट वस्ती असलेल्या भागातील कामाचं केंद्र सरकारनेही कौतुक केलेलं. राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या कामाचं आणि उपाययोजनांचंही कौतुक केलं आहे. या कामाचं, कोरोना योद्ध््यांच्या मेहनतीचं चीज व्हायला हवं, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.

तर याआधी एकदा कोरोना झाला म्हणजे पुन्हा होत नाही, हे मनातून काढून टाका. कोरोना पुन्हा मानगुटीवर बसू शकतो. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी आणि सर्व नियमांचं पालन करावं. आता कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी शासनाकडून येणार्‍या नियमांचे पालन करावं. एवढ्यात लॉकडाऊन होईल, असं म्हटलो, तर जनता घाबरून जाईल. त्यामुळे येत्या ८ ते १० दिवसातील रुग्ण संख्येचा विचार करून, पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

यावरून कोरोनाचा प्रसार वेगाने झाल्यास पुन्हा एकदा सरकारकडून जनतेवर कडक निर्बंध घातले जातील, असेच संकेत मिळत आहेत.

(maharashtra cabinet minister vijay wadettiwar hints over lockdown and strict restrictions due to second wave of coronavirus)

हेही वाचा- जनतेची जबाबदारी माझ्यावर, हे उघडा, ते उघडा सांगणाऱ्यांवर नाही- उद्धव ठाकरे
पुढील बातमी
इतर बातम्या