Advertisement

जनतेची जबाबदारी माझ्यावर, हे उघडा, ते उघडा सांगणाऱ्यांवर नाही- उद्धव ठाकरे

मला कोणताही लॉकडाऊन करायचा नाही. जनतेची जबाबदारी सरकारच्या माध्यमातून माझ्यावर आहे. हे उघडा, ते उघडा म्हणणाऱ्यांवर नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

जनतेची जबाबदारी माझ्यावर, हे उघडा, ते उघडा सांगणाऱ्यांवर नाही- उद्धव ठाकरे
SHARES

सगळं उघडलं म्हणजे कोरोना गेला, असं समजू नका. महाराष्ट्राने (maharashtra) कोरोनाची रुग्णसंख्या रोखली असली तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर आहोत. मला कोणताही लॉकडाऊन करायचा नाही. जनतेची जबाबदारी सरकारच्या माध्यमातून माझ्यावर आहे. हे उघडा, ते उघडा म्हणणाऱ्यांवर नाही. त्यामुळे सर्वांनी स्वयंशिस्त पाळून मास्क लावणं, हात धुणं, आणि सुरक्षित अंतर ठेवणं ही त्रिसूत्री पाळणं खूप गरजेचं आहे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, पाडव्यापासून आपण प्रार्थनास्थळे उघडली आहेत; पण गर्दी करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका. आपले सण, उत्सव थांबलेले नाहीत. उत्तर भारतीयांची छट पूजा झाली. चार दिवसांवर कार्तिकी एकादशी आली आहे. आषाढीला जसे आपण सर्वांनी सहकार्य केलं होतं तसं कार्तिकीला देखील करावं.

यंदा दसऱ्याला शिवसेनेचा मेळावा देखील शिवतीर्थावर मोठेपणाने साजरा न करता साधेपणाने केला, मी आपला मुख्यमंत्री आहे त्यामुळे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान…’ असे असू नये म्हणून नियम माझ्यापासून काटेकोरपणे पाळले नाही तर तुम्हाला काही सांगायचा अधिकार नाही. दिवाळीत फटाके वाजवू नका असं मी सांगितलं आणि आपण माझं ऐकलं. त्यामुळे यंदा खूप कमी फटके उडाले. प्रत्येक गोष्टींसाठी कायदे करण्याची गरज नाही, असंही उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले.

आपण कोरोना रुग्णांचे आकडे खाली आणले. पण दिवाळी आणि नंतर अधिक काळजी घेणं गरजेचं आहे, तसं होताना दिसत नाही. कोरोनाचं संकट नाहीसे झालेलं नाही. तर पाश्चिमात्य देशात बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन लावलं गेलं आहे. दिल्लीत दुसरी, तिसरी लाट आली आहे. गुजरातमध्ये रात्रीची संचारबंदी लावली आहे. ही नुसती लाट नाही तर त्सुनामी आहे की काय असं वाटतंय. 

हेही वाचा- राज्यात पुन्हा लाॅकडाऊन होणार? उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले...

आपल्याकडे आरोग्य व्यवस्था, आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. अगदी रुग्णशय्या, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, महसूल यंत्रणा, पोलिस यंत्रणा आहे. पण त्यांना किती राबवून घ्यायचं? त्यांच्यावर किती ताण टाकायचा? गेले ८ महिने ते सतत दिवसरात्र काम करताहेत, अहोरात्र मेहनत करताहेत, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळली गेली पाहिजे. आता ऑफिसेस सुरू झाले, सगळ्या गोष्टी सुरू झाल्या तरी अजूनही आपण शाळा नाही उघडू शकलो. निर्णय घेतला आहे, पण अजूनही उघडू शकू की नाही हे प्रश्नांकित आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक आजारी असतील तर काय... ही सगळी काळजी घेत आपण पुढे जात आहोत.

कोरोनाचा (coronavirus) सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्यांना आहे. आजपर्यंत आपण त्यांना सांभाळून होतो. आता कोरोनाचा संसर्ग तरुणांमध्ये वाढतोय आणि त्यांच्या माध्यमातून घराघरातल्या ज्येष्ठ मंडळीपर्यंत होतोय हे निश्चितच खूप धोकादायक आहे.  आज आपल्या हातात लस नाही, कधी येईल ते सांगता येत नाही. आली तरी राज्यातल्या सर्व लोकांना अगदी दोन डोस द्यायचे म्हटले तरी २४ ते २५ कोटी जनतेला द्यावी लागेल.

आता नवीन गोष्ट लक्षात येत आहे ते म्हणजे पोस्ट कोविड, कोविड होऊन गेल्यानंतरचे दुष्परिणाम. मेंदू, किडनी, पोट, फुफ्फुसे, श्वसन संस्थेवर परिणाम होतात आणि काही जणांना त्याचे नंतर दुष्परिणाम भोगावे लागतात. कशासाठी आपण ही विषाची परीक्षा घ्यायची? का आपण त्याकडे दुर्लक्ष करायचं? असा प्रश्न देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा