त्यांच्याकडे ही माहिती येते कशी? सीरमच्या आगीवरून मुख्यमंत्री संतापले

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीमागे विरोधकांकडून घातपातीचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यावर संताप व्यक्त करताना विरोधकांना जरा संयमाची लस टोचण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आगीबद्दल अधिक माहिती देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, आगीबद्दलची माहिती मी प्रशासकीय यंत्रणेकडून घेतलेली आहे. अदर पूनावाला यांच्यासोबत माझं अद्याप काही बोलणं झालेलं नाही. मी कोणाला फोन करुन त्रास दिलेला नाही. नुसतं मी फोन करुन काहीच होणार नाही. सर्व शांत झाल्यावर सगळ्यांशी संवाद साधणार आहे. 

देशातील लसीकरण मोहिमेत सीरमचा सिंहाचा वाटा आहे. त्याच संस्थेत आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार कोव्हिडची (coronavirus) लस तयार करणाऱ्या विभागाला आग लागलेली नाही. बीसीजी लस तयार केली जाते तिथे आग लागली होती. ही आग नियंत्रणात आली असून एकूण ६ जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. इमारतीत बांधकाम सुरु असून विद्युत बिघाडामुळं आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग विझवण्याचं काम पूर्ण झालं की आपल्याला माहिती मिळेल, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा- सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीवर अदर पुनावाला म्हणाले…

या आगीमागे विरोधक घातपाताचा संशय व्यक्त करत आहेत, याबद्दल विचारलं असता उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले, त्यांच्याकडे ही माहिती कशी येते? सर्जिकल स्ट्राइक वैगेरे इतर गोष्टी कशा कळतात हे गुपित आहे. त्यांचं ज्ञान अगाध आहे. काही विद्या वैगेरे प्राप्त असेल, माहिती असेल तर जरुर द्यावी. त्यांना जरा संयमाची लस टोचण्याची गरज आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला हाणला.

मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूटमधील बीसीजी प्लांटमधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ही आग लागली असून आग चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पसरली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या त्वरीत  घटनास्थळी दाखल झाल्या. ज्या प्लांटमध्ये ही आग लागली आहे तिथं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घेतली जाणारी बीसीजी लस तयार केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली होती त्याच इमारतीत ही आग लागलेली आहे.

(maharashtra cm uddhav thackeray reaction on serum institute fire)

हेही वाचा- पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग

पुढील बातमी
इतर बातम्या