Advertisement

सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीवर अदर पुनावाला म्हणाले…

सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी एक ट्विट करुन आगीबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.

सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीवर अदर पुनावाला म्हणाले…
SHARES

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीने देशभरात खळबळ माजली आहे. या आगीची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वांनी घेतली आहे. या आगीमागे घातपाताचा प्रकार तर नाही ना, असा संशय देखील व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी एक ट्विट करुन या आगीबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. 

कोरोना (coronavirus) प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लशीचं उत्पादन करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये गुरूवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरू केले. इमारतीत अडकलेल्या ४ कर्मचाऱ्यांपेकी तिघांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं असून एका कर्मचाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.

हेही वाचा- पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग

मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूटमधील बीसीजी प्लांटमधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ही आग लागली असून आग चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पसरली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या त्वरीत  घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ज्या प्लांटमध्ये ही आग लागली आहे तिथं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घेतली जाणारी बीसीजी लस तयार केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली होती त्याच इमारतीत ही आग लागलेली आहे. 

यासंदर्भात बोलताना अदर पुनावाला म्हणाले, 'आगीत अडकलेल्या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून कोणताही जीवितहानी झाली नाही. सध्याच्या घडीला आगीत काही मजल्यांचं नुकसान झालं आहे. पण तुम्ही दाखवलेली काळजी आणि प्रार्थनेसाठी आभार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

‘कोव्हिशिल्ड’ लसीची निर्मिती ज्या ठिकाणी होते, ते ठिकाण आगीपासून सुरक्षित असल्याचं सीरमकडून सांगण्यात आलं आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

(adar poonawalla reaction on serum institute fire)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा