मराठी भाषा भवनाची मुहूर्तमेढ, जागेचं हस्तांतरण

मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी सरकारने भूमिका घ्यावी, अशी मागणी साहित्यिक आणि साहित्यप्रेमींकडून सातत्याने होत आहे. याबाबत सरकार नक्कीच ठाम भूमिका घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात दिली.

वांद्रे पश्चिमेकडील बॅण्डस्टॅण्ड इथली जागा मराठी भाषा भवन उभारण्यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे सुपूर्द केली. या जागा हस्तांतरण कराराची कागदपत्रे मुख्यमत्र्यांच्या हस्ते भाषा भवनाच्या उभारणीची जबाबदारी असलेल्या 'ग्रंथाली'ला सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल आणि मराठी भाषा व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे देखील उपस्थित होते.

नव्या जागेचा करार

सोबतच ग्रंथालीच्या कार्यालयासाठी माहीममधील टायकलवाडी येथील जागाही देण्यात आली. २ वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेने ग्रंथालीला विद्यमान कार्यालयाची जागा खाली करण्याची नोटीस दिली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ग्रंथालीला नव्या जागेचा करार देण्यात आला.

सर्व उपक्रमांना मदत

ग्रंथाली ही एक वाचक चळवळ आहे. गेली अनेक वर्षे ज्ञानाच्या क्षेत्रात ग्रंथाली काम करत आहे. पण दुदैवाने महापालिकेच्या एका निर्णयामुळे त्यांना कार्यालय खाली करण्याची वेळ आली. आज त्या जागेचा करार ग्रंथालीकडे सुपूर्द करताना मला आनंद होत आहे. यापुढेही मराठी भाषेचं काम करणाऱ्या उपक्रमाला आवश्यक ती मदत सरकारकडून करण्यात येईल.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री


हेही वाचा-

राज्‍यातलं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ मुंबईत


पुढील बातमी
इतर बातम्या