Advertisement

राज्‍यातलं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ मुंबईत

'ग्रंथाली'च्‍या पुढाकाराने राज्यात मराठी भाषेचं पहिलं विद्यापीठ मुंबईतील वांद्रे इथं उभं राहणार आहे. मराठी भाषादिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते जागा हस्तांतरणाचा औपचारिक कार्यक्रम विधान भवनात होणार आहे.

राज्‍यातलं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ मुंबईत
SHARES

राज्यात समर्थपणे वाचक चळवळ उभारणाऱ्या 'ग्रंथाली'च्‍या पुढाकाराने राज्यात मराठी भाषेचं पहिलं विद्यापीठ मुंबईतील वांद्रे इथं उभं राहणार आहे. मराठी भाषादिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते जागा हस्तांतरणाचा औपचारिक कार्यक्रम विधान भवनात होणार आहे.

वांद्रे येथील उच्चभ्रू वस्तीतील बँडस्टँड इथली जागा मुंबई महापालिकेने विद्यापीठाला देण्‍याचं मान्‍य केलं आहे. त्या जागेचं अधिकृत पत्र मंगळवारी मुख्‍यमंत्र्यांच्‍या हस्‍ते ग्रंथालीला दिलं जाणार आहे. ग्रंथालीचे संस्‍थापक दिनकर गांगल यांच्‍या सह अन्‍य मान्‍यवर यावेळी उपस्थित असणार आहेत.


मागणी ८० वर्षांपासूनची

राज्यात मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावं ही मागणी गेल्या ८० वर्षांपासून म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून केली जात आहे. महाराष्‍ट्राची स्‍थापना झाल्‍यानंतर मराठी विद्यापीठ स्थापन करावं, अशी मागणी अखिल भारतीय साहित्‍य संमेलनाच्‍या व्‍यासपीठावरून अनेक वेळा करण्‍यात आली. परंतु, गेल्या ६० वर्षांत त्‍याला मूर्त स्‍वरूप आलं नाही.


ग्रंथालीचा पुढाकार

ग्रंथालीने अशा प्रकारे अभिमत विद्यापीठ स्‍थापन करण्‍याचा मानस व्यक्त केला होता. तसेच मराठी भाषा अभ्यास केंद्राकडूनही याचा पाठपुरावा होत होता. या विद्यापीठाची वांद्रे इथं उभारणी व्‍हावी म्‍हणून महापालिकेकडे जागेची मागणी करण्यात आली होती. महापालिकेने त्‍यासाठी जागा देण्‍याची मागणी मान्‍य केलं आहे.


जागा ताब्यात आल्यावर नियोजन

दरम्‍यान, मराठीचं हे राज्‍यातील पहिलं विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची रचना वैशिष्ट्यपूर्ण असावी, त्‍यामध्‍ये मराठी भाषेला पोषक ठरणारे कोणते उपक्रम असावेत, याबाबतचं नियोजन सुरू असून प्रत्‍यक्ष जागा ताब्‍यात आल्‍यानंतर पुढील कामांना सुरूवात होणार आहे.


कसं असेल विद्यापीठ?

मराठी भाषेतील सर्व ग्रंथ व पुस्‍तकांनी सज्‍ज असं अद्यावत ग्रंथालय यामध्‍ये असेल. तसेच मराठी भाषेच्‍या संवर्धन व प्रचारासाठी विविध उपक्रम राबविण्‍यात येतील. परीक्षा, संशोधन, लेखन प्रोत्‍साहन अशा विविध उपक्रमांचा यांत समावेश असेल.

संबंधित विषय
Advertisement