नारायण राणेंना मंत्रिमंडळात घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे डोळे लावून बसलेल्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी आनंदाची बातमी दिली आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवास्थानी पत्रकारांशी बोलताना दिली. दिवाळी स्नेहमीलन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

राणेंबाबत विचार करतोय

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करून एनडीएमध्ये सामील झालेल्या नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात सहभाग होणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना राणे यांच्याबाबत नक्कीच योग्य विचार करू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

राज, उद्धवकडे माझं बारीक लक्ष  

मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेने पळवले, यावर मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, राजकारणात काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही याचे काही प्रघात असतात. त्यामुळे मी आता जास्त काही बोलत नाही. मात्र राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोंडीवर आणि विशेषत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांवरही माझं बारीक लक्ष आहे. भाजपा खा. किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर जो आरोप केला. त्याबाबत ते माझ्याशी सविस्तर बोलणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

३ वर्षांत लोकाभिमुख निर्णय

राज्य सरकार लवकरच ३ वर्षांचा कालावधी पूर्ण करत आहे. या कार्यकाळात अनेक लोकाभिमुख निर्णय घेण्यात आले आहेत. अनेक प्रश्नांवर अजूनही काम सुरु आहे. याबाबत जनतेला माहिती करून देणं गरजेचे आहे.

सोशल मीडिया परिणामकारक

काळानुरुप माध्यमांमध्ये बदल होत गेला आहे. सध्याच्या काळात सोशल मीडिया सर्वाधिक परिणामकारक असल्याचं दिसत असून राज्य सरकार या माध्यमांचा आधार घेत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

राज्य सरकारने अनेक जाहिरात कंपन्यांना कंत्राट दिल्याचा आरोप होत आहे. मात्र हा आरोप धादांत खोटा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. माहिती महासंचालनालयाच्या बजेटच्या वर कसं कंत्राट देणार? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.


हेही वाचा -

मुंबईतील राणे समर्थक नगरसेवक संशयाच्या भोवऱ्यात


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या