SHARE

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अखेर काँग्रेसला रामराम केला. मात्र, आपण कोणत्या पक्षात जाणार आहोत, हे त्यांनी अजूनही गुलदस्त्यात ठेवले आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक नगरसेवक आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. एका बाजूला मुंबई महापालिकेतील राणे समर्थक नगरसेवक संशयाच्या भोवऱ्यात सापडले असताना शिवसेनेचे बरेच नगरसेवकही राणेच्या माध्यमातून भाजपाच्या संपर्कात असल्याने सेनेच्या नेत्यांची चिंताही वाढली आहे.

मुंबईत राणे समर्थक कालिदास कोळंबकर हे एकमेव आमदार असले तरी महापालिकेत त्यांचे ६ ते ७  समर्थक नगरसेवक आहेत. यांत सुप्रिया मोरे, कोळी, जगदीश अमिन कुट्टी, विठ्ठल लोकरे, जामसूतकर, कोरगावकर आदींचा समावेश आहे. यापैकी अमिन कुट्टी यांना नारायण राणे यांच्या कोट्यातून उमेदवारी देण्यात आली नसून माजी खा. प्रिया दत्त यांनी त्यांना तिकीट मिळवून दिले होते. मात्र, राणे यांनी आमदारकीचा आणि काँग्रेसच्या सदस्यत्वचा राजीनामा दिल्यानंतर या नगरसेवकांच्या पुढील हालचालींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

मात्र, या सर्व नगरसेवकांनी आम्ही काँग्रेसमध्येच असून काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणूनच यापुढे काम करत राहणार असल्याचे सांगितले. पुढे काय करायचे ते आम्ही ठरवले नसून आता आपल्या पक्षासाठी काय करायचे आहे, याचाच आम्ही विचार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या आम्ही काँग्रेसचे नगरसेवक आहोत हेच आम्हाला माहिती आहे, पुढे काय घडणार आहे, हे सांगणारे आम्ही भविष्यकार नाही, असे उत्तर सर्वांनी दिले आहे.

सध्या महापालिकेत भाजपाचे ८२ नगरसेवक असून शिवसेनेचे संख्याबळ ८४ एवढे आहे. मात्र, काँग्रेसच्या नगरसेविका प्रमिला पाटील यांचे निधन झाल्यामुळे त्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत प्रमिला पाटील यांच्या सुनेला भाजपाकडून उमेदवारी दिली जात आहे. तर भाजपाच्या विद्यमान नगरसेविका माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांचेही निधन झाल्यामुळे एक जागा रिक्त झाली आहे.

त्यामुळे नगरसेवकांच्या सदस्य संख्येची जमवाजमव सुरु असतानाच नारायण राणेंनी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष आपण साफ करणार असल्याचा इशारा दिला आहे. राणेंनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर राणे समर्थक आता पुढे काय करतात हेच जाणून घेण्याचे प्रयत्न सर्वच पक्षाच्यावतीने केला जात आहे. त्यामुळे हे सर्व समर्थक नगरसेवक संशयाच्या भोवऱ्यात आहेत.

शिवसेनेतील अनेक नगरसेवक हे भाजपात जाण्याच्या तयारीत असून नारायण राणे यांनी हे काम खांद्यावर घेतले आहे. त्यामुळे शिवसेनेचे काही नगरसेवक फुटतील, या भीतीने शिवसेनेचे नेते अस्वस्थ झाले आहेत. मात्र, सभागृहनेते यशवंत जाधव यांनी आमच्या पक्षातील एकही नगरसेवक फुटणार नसून नगरसेवक म्हणजे त्यांना कोंबडी वाटली का? की खुराडा फोडला आणि कोंबडी पळवून नेली. राणेंसोबत शिवसेनेचे काय काँग्रेसचे तरी जातील का हे बघावे आधी, असाही उपरोधिक टोला त्यांनी मारला.हे देखील वाचा -

'ही' आहे राणेंच्या राजीनाम्यामागील राजकीय खेळी!डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
ताज्या बातम्या