उपोषणाचा बारावा दिवस, १९ नोव्हेंबरला मराठा बांधव धडकणार मंत्रालयावर

मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गेल्या १२ दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करत असल्याने अनेक कार्यकर्त्यांची तब्येत खालावली आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे न हटण्याच्या भूमिकेवर कार्यकर्ते ठाम आहेत. मात्र सरकार लक्ष देत नसल्याने मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

आंदोलन चिघळण्याची शक्यता

त्यानुसार १९ नोव्हेंबरला राज्यभरातील मराठा बांधव मंत्रालयावर धडकतील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. तर २६ नोव्हेंबरपासून आणखी एक दुसरा गट उपोषणाला बसणार आहे. त्यामुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

कुणाकुणाचा समावेश?

मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन राज्य सरकारने दिलं आहे. प्रत्यक्षात आरक्षण देण्यासाठी सरकारने कोणतंही पाऊल उचललेलं नाही. त्यामुळे हिंगोलीतील प्राध्यापक, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संभाजी पाटील यांच्यासह १२ जण आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत.

सरकार जबाबदार

गेल्या १२ दिवसांपासून हे उपोषण सुरू असून संभाजी पाटील आणि अन्य उपोषणकर्त्याची तब्येत खालावली आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या जीवाला काही झाल्यास राज्य सरकारचं त्याला जबाबदार असेल, असं म्हणत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. त्यानुसार १९ नोव्हेंबर पासून आंदोलनाची व्याप्ती वाढणार आहे.


हेही वाचा-

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी संभाजी पाटलांचं आमरण उपोषण

मराठा समाजाचा आता महाराष्ट्र क्रांती सेना पक्ष


पुढील बातमी
इतर बातम्या