महाराष्ट्र बंद, मुंबईत ठिय्या; तरीही संभ्रम का? वाचा...

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मराठा समाजाच्या संघटनांनी गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. मात्र उच्च न्यायालयाने सुनावल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात केवळ ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. मात्र महाराष्ट्र बंद असल्याने मुंबईही बंद, अशी अफवा पसरल्यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाविषयी संभ्रमाची स्थिती आहे.

आंदोलन शांततेत

वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक सकाळी ११ वाजता जमून शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन करतील. शिवाय हे आंदोलन दुपारी २ वाजेपर्यंत राहील, असं मराठा क्रांती महामोर्चाचे मुंबईतील सन्वयक वीरेंद्र पवार यांनी बुधवारी सांगितलं होतं. मात्र संपूर्ण महाराष्ट्र बंद असल्याने मुंबई देखील बंद राहील अशी अफवा पसरल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली.

मग मुंबईत का नको?

राज्यभरात अनेक ठिकाणी मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंदचा निर्णय घेतला असेल तर मग मुंबईतही बंद का नको? अशी भूमिका घेत मुंबईत कार्यकर्ते आपापले विभाग कडकडीत बंद पाळतील असं बुधवारी मराठा क्रांती महामोर्चाचे मुंबईतील समन्वयक अमोल जाधवराव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

शिवाय हा बंद शांततेच्या मार्गाने होण्यासाठी आचारसंहिताही दिली आहे. त्यानुसार सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या दरम्यान बंद पाळला जाईल. या बंददरम्यान कोणत्याही सरकारी आणि खासगी मालमत्तांचं नुकसान केले जाणार नाही. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळल्या जातील, असं जाधवराव यांनी सांगितलं.

 

ठिय्या आंदोलनाचा निर्णय

तर मराठा क्रांती मोर्चाचे मुंबईतील सन्वयक वीरेंद्र पवार यांनी मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. दादरमधील राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला.

या बंदच्या पार्श्वभूमिवर मुंबईत शाळा, महाविद्यालय, एसटी आणि काही खासगी सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


हेही वाचा - 

महाराष्ट्र बंद, मुंबईत अनेक शाळांना सुट्टी

गुरुवारी महाराष्ट्र बंद, मुंबईत मात्र ठिय्या आंदोलन

पुढील बातमी
इतर बातम्या