राज ठाकरेंची ठाण्यातील ९ एप्रिलची सभा पुढे ढकलली, आता 'या' तारखेला होणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ठाण्यातील ९ एप्रिलला होणारी सभा आता १२ एप्रिलला होणार आहे. या सभेवरून आणि ठिकाणावरून वाद निर्माण झाल्यानं आता ही सभा १२ एप्रिलला होणार आहे. ही सभा ठाण्यातील तलावपाळी या ठिकाणी संध्याकाळी ६ वाजता होणार आहे.

राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेच्या ठिकाणावरुन वाद निर्माण झाला होता. गेल्या वेळी गडकरी रंगायतनजवळ राज ठाकरेंची सभा झाली होती. या वेळी त्याला लागून असलेल्या तलावपाळी या ठिकाणी ही सभा घेणाचा प्रस्ताव मनसेकडून पोलिसांना देण्यात आला होता. पण या ठिकाणी ९ तारखेला होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे ही सभा आता १२ तारखेला होणार असल्याची माहिती मनसेच्या वतीनं देण्यात आली आहे.

चैत्र नवरात्री सुरू आहेत. त्यामुळे यावेळी अनेकजण देवीच्या दर्शनाला बाहेर पडतात. त्यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यानं नवरात्री झाल्यानंतर ही सभा १२ तारखेला संध्याकाळी ६ वाजता तलावपाळी या ठिकाणी होणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणावर अनेकांनी टीका केली. त्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे, मदरशांमधले गैरप्रकार यावर भाष्य केलं होतं. तसेच महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यासंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर पुण्यातील वॉर्ड क्रमांक ८४ आणि प्रभाग क्रमांक १८ मधील मनसेचे शाखा अध्यक्ष माजिद शेख या पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे.

मागील काही दिवसापासून बेरोजगारी, महागाई, शिक्षण यासारखे विषय असताना हे मुद्दे सोडून जात धर्म या विषयावर भर दिला जात आहे. या कारणास्तव मी कोणाच्याही दबावाखाली न येता स्वच्छेने राजीनामा देत असल्याची माहिती माजीद अमीन शेख यांनी आपल्या पत्रात दिली आहे.

राजीनाम्याबाबत माजिद शेख म्हणाले की, २००९ पासून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम करत असून शाखा अध्यक्ष आहे. माझ्या प्रभागात हिंदू-मुस्लिम एकत्रित राहतात. मी माझ्या भागात पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम केलं आहे. पण गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये नाराजी असल्यामुळे मी शहर अध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष यांच्याकडे राजीनामा दिला आहे.


हेही वाचा

यशवंत जाधवांना झटका, ४१ मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त

किरीट सोमय्या, नील सोमय्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुढील बातमी
इतर बातम्या