राज ठाकरेंनी चंद्रकांतदादांना पाठवली 'या' मुलाखतीची लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या एका मुलाखतीची एक लिंक पाठवली आहे. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविषयीची आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. या भूमिकेच्या माध्यमातून भाजप-मनसे युती होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो असं म्हटलं जात आहे.

राज ठाकरे यांनी वेळोवेळी इंग्रजी, हिंदी वृत्तवाहिन्यांना मुलाखत देऊन परप्रांतीयांविषयीची भूमिका स्पष्ट केलेली आहे. तरीही अनेकदा राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत राहिले आहेत. एवढंच नाही तर उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून राज ठाकरे यांनी हिंदीत भाषण करूनही आपलं म्हणणं त्यांच्यापुढं ठेवलं होतं.

नुकतीच चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांची नाशिकमध्ये भेट घेतली होती. त्यांच्या पाठोपाठ आता भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) देखील राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. मुनगंटीवार यांनीच या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं की, राज ठाकरे यांनी फोन करून मला भेटायला बोलवलं आहे. त्यानुसार येत्या आठवड्यात मी त्यांना भेटायला जाणार आहे. आमच्या भेटीत युतीचा विषय वैगेरे नाही. परंतु बरेच दिवस त्यांना भेटलेलो नसल्याने त्यांना मी भेटणार आहे.

त्याआधी नाशिकच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरे (raj thackeray) आणि चंद्रकांत पाटील यांच्यात योगायोगाने भेट झाली होती. दोन्ही नेते शासकीय विश्रामगृहातच थांबलेले असल्याने पार्किंग लॉटमध्ये दोघांमध्ये छोटेखानी भेट झाली. यावेळी त्यांनी १५ मिनिटं एकमेकांसोबतच चर्चाही केली. 

हेही वाचा- महापालिका निवडणुकीसाठी मनसे-भाजप युती होणार?

याविषयी प्रसारमाध्यमांना माहिती देताना, बरेच दिवस झाले भेटलो नाही, असं मी त्यांना म्हणालो होतो. ते म्हणाले, मुंबईत कधी येतोस. आता पुढच्या आठवड्यात मी मुंबईला जाणार आहे. मुंबईत भेटतो त्यांना. आम्ही विद्यार्थी चळवळीत होतो. ४०-४२ वर्षापासूनची आमची मैत्री आहे. त्यानंतर भेट झाली नाही. आम्ही नाशिकमध्ये असूनही आमची भेट झाली नव्हती. आज झाली. तासभर भेटलंच पाहिजे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

तसंच राज ठाकरे यांनी मला सांगितलं की त्यांच्या उत्तर भारतीय भाषणांचा विपर्यास झाला. त्याची लिंकही ते मला पाठवणार आहेत. आम्ही जर रयत संघटना आणि इतरांना मान देऊ शकतो, तर राज ठाकरे हे मोठं नेतृत्व आहे. राज ठाकरे यांच्याबाबत भाजप कोअर टीम निर्णय घेईल, असंही चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी स्पष्ट केलं.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या अलिकडच्या भाषणाच्या काही क्लिप्स चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्याची माहिती मिळत असून यामुळे भाजप-मनसे युतीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

हेही वाचा- पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई महापालिकेचं विशेष पथक महाडकडे रवाना

पुढील बातमी
इतर बातम्या