राज ठाकरेंचंही ‘’जय श्री राम?, जाणार अयोध्येला

पक्षाचा झेंडा बदलत हिंदुत्वाच्या अजेंड्यावर लक्ष केंद्रीत करू पाहणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) लवकरच अयोध्या दौरा करून रामलल्लाचं दर्शन घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसं झाल्यास येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपशी जवळीक करतानाच हिंदुत्ववादी मतं खेचण्यात मनसे यशस्वी होऊ शकते, असा अंदाज लावला जात आहे.

येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची महत्त्वाची बैठक वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये झाली. या बैठकीत मनसेच्या पुढील रणनीतीवर चर्चा झाली. सोबतच राज ठाकरे १ ते ९ मार्च या कालावधीत अयोध्येचा दौरा करण्याचे संकेत असल्याने त्यानुसार कार्यक्रमाची आखणी करण्याचं काम सुरू असल्याची माहिती पुढं येत आहे. पक्षाच्या बैठकीमध्ये यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

याआधी सर्वसमावेशक मराठी बांधवाच्या हक्कासाठी लढणाऱ्या मनसेने (mns) आपल्या अजेंड्याची व्याप्ती वाढवत प्रांतवादासोबत हिंदुत्ववादी विचारसरणीलाही जवळ केलं. त्यानुसार पक्षाचा झेंडा बदलून कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत करण्याचाही प्रयत्न झाला. या बदलाचे अपेक्षित परिणाम हळुहळू दिसून येत आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी ३० हून अधिक ग्रामपंचायती ताब्यात घेत पक्षाला बळ देण्याचं काम केलं आहे. 

हेही वाचा- मुंबईत भाजप-मनसे युतीची चर्चा?

ग्रामपंचायत निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकजुटीने लढवल्याने भाजप (bjp) मनसेला साथीला घेऊ निवडणूक लढवणार का असा प्रश्न सातत्याने भाजप नेत्यांना विचारला जात होता. परंतु ग्रामीण भागात मनसेचं फारसं अस्तित्व नसल्याने भाजपने एकट्यानेच लढण्याचं ठरवलं. परंतु महापालिका निवडणुकीत मनसे सोबतच्या युतीचा विचार होऊ शकतो, असे संकेत देखील दिले होते.

त्यानुसार राज ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केल्यानंतर हिंदुत्ववादी विचारसणीच्या अजेंड्यावर दोन्ही पक्षांची युती झाल्यास ही युती नैसर्गिक वाटू शकते. त्याचा मुंबई महापालिका (bmc), औरंगाबाद महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांना फायदा मिळू शकतो, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. 

शिवसेनेने (shiv sena) काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या धर्मनिरपेक्षतावादी विचारसरणीच्या पक्षांसोबत आघाडी केल्यापासून शिवसेनेच्या हिंदुत्वावर विरोधकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही पोकळी भरून काढण्याची चांगली संधी मनसेकडे आहे. त्या दृष्टीकोनातून राज ठाकरे यांचा दौर पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो.    

( mns chief raj thackeray to visit ayodhya ahead of bmc election)

हेही वाचा- निर्बंध उठताच सामाजिक न्याय विभागात पदभरती- धनंजय मुंडे
पुढील बातमी
इतर बातम्या