मनसे नेते अमित ठाकरे पुण्यात स्वप्नील लोणकरच्या आई-वडिलांच्या भेटीला

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र व मनसे नेते अमित ठाकरे यांनी स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबियांची भेट घेतली. अमित ठाकरे मुंबईहून सकाळी ७ वाजता पुण्याकडे निघाले. स्वप्निल लोणकरने २९ जून रोजी पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट लिहून 'स्वप्नीलच्या दुर्दैवी घटनेतून महाराष्ट्र लोकसेवा आयोग योग्य तो बोध घेईल आणि आपला ‘दिरंगाईचा खेळ’ कायमचा थांबवेल' अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानंतर आता अमित ठाकरे स्वप्नीलच्या आई-वडिलांच्या सांत्वनासाठी पुण्याला जात आहेत. स्वप्निलला न्याय देण्याची मागणी करत काल नवी मुंबईत मनसेने शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वात आंदोलनही केले होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर नावाच्या तरुणाने पुण्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) स्वप्निलच्या आई वडिलांच्या भेटीसाठी पुण्याला जात आहेत. अमित ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळेसुद्धा आहेत.

एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील लोणकर हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यांसारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने अखेर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

पासआऊट होऊन दोन वर्ष झाली आहेत. २४ वय संपत आलं आहे. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेले कर्ज, खासगी नोकरी करुन कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना. नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस मनात होती. पण काही तरी चांगलं होईल या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे काहीच उरलेलं नाही. यास कोणत्याही व्यक्ती कारणीभूत नसून हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. मला माफ करा, १०० जीव वाचवायचे होते, मला डोनेशन करुन मात्र आता ७२ राहिले, अशी सुसाईड नोट स्वप्नीलने लिहिली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या