मनसेचे शिशीर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर?

वसंत गिते, राम कदम आणि प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक बडे नेत्यांनी मनसेला रामराम ठोकल्यानंतर आता मनसेचे विद्यमान चिटणीस शिशीर शिंदे यांनीसुद्धा मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मनलेला आणखी एक धक्का बसणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

मनसेतून बाहेर पडणार?

शिशीर शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तिय म्हणून ओळखले जातात. शिशीर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून शिशीर शिंदे मातोश्रीच्या संपर्कात होते, तर गेल्या आठवड्यात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी दोघांमध्ये दिर्घकाळापर्यंत चर्चाही झाली होती, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

पक्षावर होते नाराज

मुंबई महापालिका निवडणुकीच्यावेळी शिशीर शिंदे यांना डावलण्यात आल्याने ते पक्षावर नाराज होते. त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंना पत्रही लिहलं. या पत्रात त्यांनी आपल्याला मनसेच्या नेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी विनंती केली होती. याचसोबत काही दिवसांपासून शिंदे मनसेच्या विभागवार बैठकांपासून दूर राहत होते.

कोण आहेत शिशीर शिंदे?

मनसेचे विद्यमान सरचिटणीस असलेले शिशीर शिंदे 2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवणारे मनसेच्या 13 आमदारांपैकी एक होते. ते भांडुपमधून विजयी झाले होते. अत्यंत धाडाडीचे नेते अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या नेत्यांमध्ये शिशीर शिंदे यांचा समावेश होता. त्यानंतर ते मनसेचे आमदार म्हणून निवडून आले. पण, मुंबई महापालिका निवडणुकीच्या दरम्यान निर्णयप्रक्रियेपासून त्यांना लांब ठेवल्याने ते नाराज होते.

दोन्ही पक्षाकडून कोणतीच प्रतिक्रिया नाही

शिशिर शिंदे यांनी गेल्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. ते लवकरच मनसेला राम राम करून शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती मिळत असून याबाबत शिशिर शिंदे, मनसे तसेच शिवसेना या तिन्ही पक्षांनी अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


हेही वाचा - 

'इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो' - राज ठाकरे

मनसेचा ठाण्यात राडा... बुलेट ट्रेनचा सर्व्हे रोखला

पुढील बातमी
इतर बातम्या