इंधन दरांच्या दुर्दैवी वाढीची नोंद करा, मनसेचं 'गिनीज बुक'ला पत्र

पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत असून हे दर आता शंभरी गाठतात की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. इंधन दरवाढीमुळं महागाई वाढली असून सर्वसामान्य हैराण झाले आहेत. इंधन दरवाढीविरोधात 'भारत बंद' केला, आंदोलन केली तरी केंद्र सरकार लक्ष देत नसल्याचं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं निषेधाचा वेगळाच मार्ग निवडला आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी थेट 'गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकार्ड'लाच पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी जगात सर्वात जलद पेट्रोल दरवाढ होणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश झाल्याने 'दुर्दैवी' रेकाॅर्ड विभागात भारताची नोंद करण्याची मागणी केली आहे.

इंधनाने गाठली नव्वदी

गेल्या काही महिन्यांपासून इंधनाचे दर सातत्याने वाढत असून मागील १५ दिवसात इंधनाच्या दरांनी नवा उच्चांक गाठला आहे. देशात काही ठिकाणी पेट्रोलच्या दरानं नव्वदी गाठली असून पेट्रोल-डिझेलचे दर शंभरी गाठतील की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशभर इंधन दरवाढीविरोधात आंदोलन होत असताना केंद्र सरकार मात्र इंधनाचे दर कमी करणं आमच्या हातात नाही असं म्हणत हात झटकत आहे.

सर्वसामान्य हैराण

इंधन दरवाढीला आणि महागाईला सामान्य जनता वैतागली असताना सरकार हात झटकत आहे हे दुर्देवी आहे. इंधन दरवाढ सातत्यानं होणं हे दुर्दैवी आहे, असं म्हणत 'गिनीज बुक'ने भारताची 'दुर्दैवी' विभागात नोंद करावी, अशी आम्ही पत्राद्वारे मागणी केल्याची माहिती जाधव यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


हेही वाचा-

नागराज, आर्ची-परशाचा 'सैराट' निर्णय, 'मनचिसे'त घेतला प्रवेश

शिवसेनेला स्वत: ची भूमिकाच नाही- राज ठाकरे


पुढील बातमी
इतर बातम्या