इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक २ वर्षे रखडणार

दादर इथल्या इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar )स्मारकाच्या कामास मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. स्मारकाच्या (Ambedkar memorial) कामास कोरोना साथीचा मोठा फटका बसला आहे. पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम अवघे सहा टक्के झाले आहे.

बाबासाहेबांचा चीनमध्ये बनवण्यात येणारा पुतळा दोन्ही देशांतील संबंध बिघडल्यामुळे आता भारतात दिल्ली इथं बनवण्यात येणार आहे.

मुंबईतील इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली असून ते मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती एमएमआरडीए प्रशासनाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे मुंबईतील आंबेडकर स्मारकाबाबत विविध माहिती मागवली होती. अनिल गलगली यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकल्प १४ महिन्यांपूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु कंत्राटदारांनी त्यास विलंब केला.

एमएमआरडीएने आता विस्तारित कालावधीत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक आहे. यासंदर्भात गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि एमएमआरडीए आयुक्तांना पत्रे पाठवली आहेत.

कंत्राटदाराला २०९ कोटी रुपये दिले असून इमारतींचे काम ४९ टक्के, तर चबुतऱ्याचे काम ६ टक्के काम पूर्ण झाले आहे. स्मारकाच्या मूळ संकल्पनेनुसार अपेक्षित खर्च ७६३ कोटी आहे. सुधारित संकल्पनेनुसार १ हजार ८९ कोटी ९५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. आतापर्यंत प्रकल्पातील एकूण २०९ कोटी ५३ लाख रुपये २३ नोव्हेंबर २०२१ रोजी अदा करण्यात आले आहेत.

यात आगाऊ रक्कम म्हणून ३१ कोटी ६५ लाख रुपये, प्रकल्प सल्लागाराच्या शुल्कापोटी १२ कोटी ६८ कोटी रुपयांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे कंत्राटदार मेसर्स शापूरजी पालनजी तर प्रकल्प सल्लागार शशी प्रभू असोसिएट्स आहेत.

स्मारकाच्या कामाचा ९ फेब्रुवारी २०१८ रोजी कार्यादेश जारी करण्यात आला असून ३६ महिन्यांत म्हणजे फेब्रुवारी २१ मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रकल्पाचे काम १४ महिन्यांपूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असताना कंत्राटदार आणि स्मारकाचे प्राधिकरण असलेल्या एमएमआरडीएमुळे कामास मोठा उशीर होत असल्याबाबत आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे.

  • स्मारकात ७६.६८ मीटर चौमी उंचीचा पुतळा असणार आहे. राम सुतार यांनी पुतळ्याची प्रतिकृती बनवली. ती पुतळा समितीने मंजूर केली. मात्र सरकारने त्यास मंजुरी दिली नाही.

  • बाबासाहेबांचा पुतळा ३५० फूट उंचीचा असणार आहे. त्याचे ओतीव काम चीनमध्ये करायचे होते. सध्या दोन्ही देशांचे संबंध बिघडल्याने पुतळा दिल्लीत बनवण्यात येणार आहे.

  • देशांतर्गत इतका उंच पुतळा प्रथमच बनवला जात असून नरेंद्र मोदी यांचा मेक इन इंडिया हा संकल्प बाबासाहेबांचा देशांतर्गत पुतळा बनवून प्रत्यक्षात आणला जाईल.


हेही वाचा

"त्याला महत्त्व देऊ नये",अजित पवारांची राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, राजू पाटील म्हणाले...

पुढील बातमी
इतर बातम्या