कुलाब्यात शववाहिकेवरील भाजप नेत्यांच्या प्रचारावरून वाद

मुंबईतील कुलाबा परिसरात अंत्ययात्रेसाठी वापरण्यात येणाऱ्या शववाहिकेवर भाजप नेत्यांचे फोटो लावल्याने वाद निर्माण झाला आहे. या शववाहिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यासह नार्वेकर कुटुंबातील इतर सदस्यांचे फोटो झळकले आहे. यावरून नागरिक आणि सोशल मीडियातून टीका होत आहे.

कुलाबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या शववाहिकेवर मकरंद नार्वेकर (Makarand Narwekar), हर्षिता नार्वेकर (Harshita Narwekar) आणि गौरवी शिवालकर (Gauravi Shivalkar) यांचेही फोटो आहेत.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि मुंऱ्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचेही फोटो वाहनावर लावण्यात आले आहेत.

अंत्यसंस्कारासारख्या संवेदनशील आणि भावनिक प्रसंगी वापरल्या जाणाऱ्या वाहनावर राजकीय प्रसिद्धी केल्याने अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरही यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत असून सार्वजनिक सेवांचा वापर राजकीय जाहिरातींसाठी करू नये, अशी मागणी केली जात आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी सामाजिक संस्था, ट्रस्ट किंवा लोकप्रतिनिधींकडून शववाहिका सेवा पुरवली जाते. मात्र अशा सेवांवर मोठ्या प्रमाणात राजकीय फोटो आणि प्रचार दिसू लागल्याने सार्वजनिक सुविधांच्या राजकीय ब्रँडिंगवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

नागरिकांकडून आता शववाहिका, रुग्णवाहिका आणि बसथांबे यांसारख्या सार्वजनिक सेवांवर राजकीय जाहिरातींवर स्पष्ट नियम करण्याची मागणी होत आहे.


हेही वाचा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे 30 मेपासून बेमुदत उपोषण

पुढील बातमी
इतर बातम्या