काँग्रेस काढणार फेरीवाल्यांसाठी मोर्चा

काँग्रेस फेरीवाल्यांना समर्थन देण्यासाठी  बुधवारी १ नोव्हेंबरला दादरमध्ये मूक मोर्चा काढणार आहे. यामुळे फेरीवाला हटाव मोहिमेवरून तापलेल्या राजकारणात नवी वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

‘फेरीवाला सन्मान मार्च’

फेरीवाल्यांना समर्थन देण्यासाठी ‘फेरीवाला सन्मान मार्च’ काढण्यात येईल, अशी माहिती मुंबई काँग्रेसने दिली आहे. दादरमध्ये मराठी फेरीवालेदेखील आहेत, मात्र सध्या ते दहशतीत आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा काढणार असल्याचं मुंबई काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.

संजय निरुपम यांच्याकडून समर्थन

मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला होण्याच्या काही वेळापूर्वी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची मालाडमध्ये सभा झाली होती. त्यांनी फेरीवाल्यांशी संवाद साधला होता. संजय निरुपम यांनी चिथावल्यामुळेच फेरीवाल्यांनी हल्ला केल्याचा आरोप मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केला होता. याचे गंभीर परिणाम मुंबईभर पहायला मिळतील, असा इशारा संदीप देशपांडे यांनी संजय निरुपम यांना दिला होता. दुसरीकडे निरुपम यांनी मनसेचे कार्यकर्ते फेरीवाल्यांकडून हप्ता मागतात. त्यामुळेच फेरीवाल्यांनी हल्ला केला, असा आरोप केला.

निरुपम यांच्याविरोधात गुन्हा दाखल

विनापरवागी सभा घेऊन लोकांना कायदा हातात घेण्याचं आवाहन करणाऱ्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी निरुपम यांच्या भडकाऊ भाषणाचं व्हिडिओ रेकॉर्डिंगही केलं आहे. मात्र आता काँग्रेसकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चामुळे राजकारण अधिक तापेल यात शंका नाही.


हेही वाचा - 

फेरीवाला वादात मनसे पाठोपाठ राणे पुत्रांची उडी

मालाडमध्ये मनसे विभाग अध्यक्षाला फेरीवाल्यांकडून जबर मारहाण


पुढील बातमी
इतर बातम्या